जोहान्सबर्ग SA vs PAK 3rd ODI Live Streaming : दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा वनडे सामना आज म्हणजेच 22 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील द वॉन्डर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पाकिस्ताननं जिंकली मालिका :तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात पाहुण्या पाकिस्तान संघानं विजय मिळवत या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आता आजचा शेवटचा आणि तिसरा वनडे सामना जिंकत पाकिस्तान संघ आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल तर हा सामना जिंकत यजमान दक्षिण आफ्रिका घरच्या मैदानावर आपली प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल.
दुसऱ्या सामन्यात काय झालं : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 329 धावा केल्या. बाबर आणि रिझवान यांच्यात 23.3 षटकांत 4.89 च्या धावगतीनं झालेल्या 115 धावांच्या भागीदारीशिवाय, कामरान गुलामच्या झटपट अर्धशतकानंही पाकिस्तानला एवढी मोठी धावसंख्या गाठण्यात मोठी भूमिका बजावली. बाबर आझमनं 73 धावा, मोहम्मद रिझवाननं 80 धावा केल्या, तर कामरान गुलामनं 196 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं 63 धावा केल्या.
पाकिस्तान बनला यशस्वी संघ : दक्षिण आफ्रिकेसमोर 330 धावांचं मोठं लक्ष्य होतं, ज्याचा पाठलाग करताना ते 43.1 षटकांत सर्वबाद 248 धावांत आटोपले. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी मिळून 7 बळी घेतले. शाहीननं 4 तर नसीमनं 3 बळी घेतले. याशिवाय अबरार अहमदनं 2 तर सलमान आघानं 1 बळी घेतला. कामरान गुलामला त्याच्या स्फोटक खेळासाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आलं. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेत केलेल्या पराक्रमानंतर, त्या भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा तो सर्वात यशस्वी परदेशी संघ बनला आहे.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका वनडे फॉरमॅटमध्ये 85 वेळा आमनेसामने आले आहेत. या 83 वनडे सामन्यांपैकी 32 पाकिस्ताननं जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेनं 52 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?