जोहान्सबर्ग Boycott Afghanistan Match : 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आता फक्त काही आठवडे दूर आहे. त्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट संघ चर्चेत आला आहे. आधी इंग्लंड आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. खरं तर, दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेन्झी यांनी त्यांच्या संघाला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना न खेळण्याची विनंती केली आहे. 2021 मध्ये तालिबान सरकार परतल्यानंतर महिलांना क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ खेळण्यास बंदी घालण्यात आली होती, त्यामुळं अफगाणिस्तानवर बहिष्कार करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काय म्हणाले मॅकेन्झी : याबाबत बोलताना दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेन्झी म्हणाले, "मी हे स्पष्ट करु इच्छितो की आयसीसीचा सर्वांप्रती समान दृष्टिकोन आहे. ते सर्व देशांमध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटवर भर देण्याचा प्रयत्न करतात, परंतु अफगाणिस्तानात असं घडत नाही. यावरुन हे स्पष्ट होतं की क्रीडा प्रशासनात राजकीय हस्तक्षेप आहे. अशाच एका प्रकरणात, 2023 मध्ये श्रीलंकेला बंदी घालण्यात आली होती."
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाका : मॅकेन्झी यांनी त्यांच्या निवेदनात पुढं म्हटलं की, "मला माहिती आहे की आयसीसी हा नियम पाळते की खेळांमध्ये कोणत्याही प्रकारे राजकीय हस्तक्षेप नसावा. मी क्रीडा मंत्री आहे, परंतु हा निर्णय घेणं माझ्या अधिकारात नाही. दक्षिण आफ्रिका भविष्यात अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळले पाहिजेत." तसंच अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्यानं जगात महिला सक्षमीकरणाकडे चांगला संदेश जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
इंग्लंडच्या खासदारांनीही केली मागणी : यापूर्वी, इंग्लंडच्या 160 खासदारांनी ईसीबीला पत्र लिहून महिला हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं कारण देत अफगाणिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. ही मागणी ईसीबीनं फेटाळून लावली, कारण एका मंडळानं या प्रकरणात आवाज उठवल्यानं काहीही साध्य होणार नाही, परंतु सर्वांना एकत्र यावं लागेल, असं ईसीबीनं म्हटलं होतं.
हेही वाचा :
- भारतीय महिला ब्रिगेडविरुद्ध आयरिश संघ पहिला सामना जिंकत इतिहास रचणार? 'इथं' पाहा ऐतिहासिक मॅच लाईव्ह
- 4,4,4,4,4,4,4... सहा चेंडूत सात चौकार; भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं, पाहा व्हिडिओ