सेंच्युरियन South Africa Qualifies For WTC 2025 Final :दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क इथं खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 2 विकेटनं विजय मिळवला. या विजयासह यजमान दक्षिण आफ्रिकेनं WTC फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर हा सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकल्यानं आता भारताचा WTC फायनल गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे.
अंतिम फेरीत कधी आणि कोणाशी सामना? : WTC फायनल जून 2025 मध्ये लंडनमधील लॉर्ड्स ग्राउंडवर खेळली जाईल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना कोणत्या संघाशी होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक रोमांचक कसोटी मालिका सुरु आहे. मेलबर्न कसोटीत शेवटच्या दिवसाचा खेळ बाकी असून या सामन्याच्या निकालावर अंतिम फेरीत कोण किती जवळ जाईल हे ठरवू शकेल.
रोमांचक सामन्यात आफ्रिकेचा विजय : पाकिस्ताननं दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अडखळत झाली. त्यांनी 19 धावांत आघाडीचे तीन फलंदाज गमावले मात्र. यानंतर कर्णधार टेंबा बावुमा आणि एडन मार्कराम यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र यानंतर मार्करामच्या रुपात संघाला 62 धावांवर चौथा धक्का बसला. परंतु यानंतर 96 धावांवर संघाला पाचवा धक्का बसला यानंतर एका धावेच्या अंतरात संघानं तीन बळी गमावले आणि संघाची अवस्था 8 बाद 99 धावा झाल्या. इथून पुढं मार्को यान्सन आणि रबाडा यांनी अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानची प्रथम फलंदाजी : या सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 56 धावा करुन संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी थोडा प्रतिकार केला. मात्र तरी पहिल्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 57.3 षटकात केवळ 211 धावांवरच गारद झाला होता. पाकिस्तानकडून कामरान गुलामनं सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून डॅन पॅटरसननं सर्वाधिक 5 बळी घेतले. डॅन पॅटरसनशिवाय कॉर्बिन बॉशनं पदार्पणाच्या सामन्यात चार बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेची आघाडी : पाकिस्तानच्या 211 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 24 धावा करुन संघाचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र यानंतर एडन मार्करामनं 89 तर कॉर्बिन बॉशनं नाबाद 81 धावा या दोघांच्या खेळीच्या बळावर पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 73.4 षटकांत 301 धावा करत सर्वबाद झाला. परिणामी दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्या डावात 90 धावांची आघाडी घेतली.
दक्षिण आफ्रिकेला 148 धावांचं लक्ष्य : यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 59.4 षटकात 237 धावा करत सर्वबाद झाला. पाकिस्तानसाठी सौद शकीलनं 84 धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सननं सर्वाधिक सहा बळी घेतले. यामुळं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 148 धावांचं लक्ष्य मिळालं.
हेही वाचा :
- 3 DRS, 6 गोलंदाज, 18 ओव्हर... तरीही रोहितसेनेला मिळाली नाही दहावी विकेट
- 95 ओव्हर, 330 धावा... टेस्ट मॅचमध्ये दिवसभर दोनच फलंदाजांनी केली बॅटींग; एका विकेटसाठी तरसले बॉलर