SA vs ENG T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024चा 45 वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे. सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय होता, त्यामुळं आफ्रिकेचं उपांत्य फेरीत जाणं जवळपास निश्चित झालं. दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडसमोर 164 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. इंग्लंड संघाची धावसंख्या 11 व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावा होती, त्यानंतर हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या 78 धावांच्या भागीदारीनं इंग्लंडला सामन्यात परत आणलं, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे बदलला. लिव्हिंगस्टोननं 17 चेंडूत 33 धावा केल्या, तर ब्रूकनं 37 चेंडूत 53 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी : प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 163 धावा केल्या. क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिक्स यांच्यात 86 धावांची सलामीची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिका 200 धावांचा टप्पा सहज पार करेल असं वाटत होतं, पण मधल्या षटकात त्यांनी केवळ 52 धावा केल्या. क्विंटन डी कॉकनं 38 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 65 धावा केल्या. डेव्हिड मिलरनं 28 चेंडूत 43 धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 163 पर्यंत नेण्यात मोठं योगदान दिलं.
आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचं लोटांगण :164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला, पण 8 चेंडूत केवळ 11 धावा करुन फिलिप सॉल्ट बाद झाला, तेव्हा चौकार-षटकारांचा पाऊस सुरू झाला नव्हता. केशव महाराजनं जॉनी बेअरस्टोची विकेट घेतली तेव्हा स्कोअरबोर्डवर 50 धावाही नव्हत्या, त्यानं 20 चेंडूत 16 धावा केल्या. महाराजनं पुढच्याच षटकात कर्णधार जोस बटलरची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिल्यानं विकेट पडण्याचा सपाटा सुरू झाला. बटलरला 20 चेंडूत केवळ 17 धावा करता आल्या. मोईन अलीही काही खास कामगिरी दाखवू शकला नाही, तो बाद झाल्यामुळे इंग्लंडनं 61 धावात 4 विकेट गमावल्या.