बीड Shiv Chhatrapati Sports Award 2023-24 : भारताचा दिग्गज धावपटू तसंच बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याला 2022-23चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारनं गुरुवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केले. यात ही घोषणा करण्यात आली. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन अविनाशनं इतिहास घडवला होता. यात पदक जिंकता आलं नसलं तरी अविनाशनं राष्ट्रीय विक्रम केला होता. आता राज्य सरकारनं त्याला पुरस्कार जाहीर केला आहे. तसंच 2022-23चा जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जाहीर झाला आहे. तर भारताचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माचे मार्गदर्शक दिनेश लाड यांना जिजामाता पुरस्कार जाहीर झाला आहे.
बीडमध्ये जल्लोष : बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा येथील रहिवाशी असलेले अविनाश साबळे याच्यासह अनेक खेळाडूंना राज्य सरकारनं पुरस्कार घोषित केले आहेत. अविनाश साबळेला मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाल्यानं आष्टीत जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानं नुकत्याच झालेल्या पॅरिसमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला, परंतु पदकापासून तो दूर राहिला. तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेल्या प्रदीप गंधे यांनी 1982च्या आशियाई स्पर्धेत मिश्र दुहेरी व पुरुष सांघिक गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाला देण्यात येणाऱ्या जिजामाता पुरस्कारासाठी पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स ), अनिल भोईल (कबड्डी), शुभांगी रोकडे (तिरंदाजी), राजाराम घाग (दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शक), दिनेश लाड (क्रिकेट) व सुमा शिरुर (नेमबाजी) यांची निवड केली गेली आहे.