मेलबर्न Sam Konstas vs Jasprit bumrah : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटीला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पॅट कमिन्सनं 19 वर्षीय युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टंट्सला मैदानात उतरवलं. पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं फलंदाजीत कहर केला. या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध कॉन्स्टंटनं जोरदार हल्ला केला आणि भरपूर धावा केल्या. त्यानं बुमराहच्या एकाच षटकात 18 धावा दिल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक आहे. एवढंच नाही तर त्यानं बुमराहविरुद्ध दोन षटकारही ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहला षटकार मारणारा तो फक्त सातवा आणि दोन षटकार मारणारा दुसराच खेळाडू आहे.
4483 चेंडूंनंतर बुमराहला षटकार : जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टंट्सनं सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही षटकांमध्येच रॅम्प शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करुन त्यानं सामन्यात कोणत्या मूडमध्ये प्रवेश केला होता हे दाखवून दिलं. पहिल्या 3 षटकांमध्ये बुमराह अपयशी ठरला तरीही कॉन्स्टंट्स थांबला नाही. डावाच्या सातव्या षटकात, त्यानं बुमराह विरुद्ध थर्ड मॅनवर रिव्हर्स शॉटद्वारे पुन्हा षटकार ठोकला. कसोटी क्रिकेटमध्ये 3 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आणि 4483 चेंडूंनंतर बुमराहविरुद्ध मारलेला हा पहिला षटकार होता. या षटकात कॉन्स्टंट्सनंही 2 चौकार मारत 14 धावा केल्या. मात्र, त्याचा हल्ला इथंच थांबला नाही.