मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱहे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. साहित्य संमेलनाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. खासदार संजय राऊत यांनीही याबाबत बोलताना शरद पवार यांना जबाबदार धरलं होतं. या सर्व आरोपांना शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.
व्यासपीठाचा राजकीय वापर हा आरोप खोटा : साहित्य संमेलन असल्यावर वादविवाद होतात. नीलम गोऱहे यांनी ते भाष्य त्या व्यासपीठावरुन करणं गरजेचं नव्हतं. या प्रकरणावर संजय राऊत हे शंभर टक्के बरोबर बोलले. मात्र, या व्यासपीठाचा राजकीय वापर होतो हा आरोप मला मान्य नसल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. महादजी शिंदे पुरस्कार वितरणावरुनही शरद पवार यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
संजय राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर : "संजय राऊत म्हणाले ते 100 टक्के बरोबर आहे. नीलम गोऱ्हे यांनी हा वाद निर्माण करण्याची काही गरज नव्हती. नको त्या गोष्टी सांगण्याची गरज नव्हती. नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत काम केलं. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत आल्या. नंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या. आता त्या शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहेत. एवढ्या मर्यादित कालावधीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वतःचा अनुभव लक्षात घेता असं भाष्य करायला नको होतं. त्या संबंधात संजय राऊत जे म्हणाले ते योग्य आहे," असं म्हणत शरद पवार यांनी नीलम गोऱहेंच्या आरोपांचा समाचार घेतला. "मी स्वागताध्यक्ष असल्यानं त्यांनी माझ्यावर जर काही जबाबदारी टाकली असेल, तर ते मला मान्य आहे," असंही यावेळी पवार म्हणाले.
मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो : "साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱयांनी माफी मागितली. त्यामुळं मी म्हटलं की पडदा टाका. संजय राऊत यांना माझ्यावरही जबाबदारी टाकायची असेल तर माझी तक्रार नाही कारण मी संमेलनाचा स्वागताध्यक्ष होतो. माझी संजय राऊत यांच्याबाबत काही तक्रार नाही. नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य मूर्खपणाचं होतं. यापेक्षा जास्त मी काहीही बोलणार नाही," असं म्हणत या सर्व वादावर पडदा टाकण्याचं एकप्रकारे आवाहनच शरद पवार यांनी केलं.
हेही वाचा -