नाशिक Sahil Parakh : नाशिकच्या समस्त क्रीडाप्रेमी व खास करुन क्रिकेट रसिकांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू, आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची 19 वर्षांखालील वयोगटातील भारतीय संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठीच्या भारतीय संघात, साहिल पारखची हि निवड बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी घोषित केली. पॉंडिचेरी इथं 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान 19 वर्षांखालील भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवासीय सामन्यांची मालिका होत आहे. भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ इतर देशांशी आंतरराष्ट्रीय सामने खेळत असतो, तसंच आयसीसीतर्फे नियमितपणे 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकही आयोजित करण्यात येत असतो.
नाशिकचा खेळाडू भारतीय संघात : नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. साहिलच्या रुपानं नाशिकचा खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करणार आहे. युवा साहिल पारखची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एमसीएतर्फे नव्या 2024-25 हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी याआधीच निवड झाली आहे. साहिल पारख 26 एप्रिल ते 22 मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात सहभागी झाला होता. त्यापूर्वीच्या हंगामात देखील 16 वर्षांखालील वयोगटात साहिलची निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्हिव्हिएस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए बेंगळुरुतर्फे भारतभरातील उदयोन्मुख, युवा खेळाडूंसाठी हे शिबीर झालं. साहिल पारेखचं शिबिर नाडियाद इथं पार पडलं. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच 19 वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ साहिलची यंदा एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली होती.
साहिल पारखची दमदार कामगिरी :साहिलनं मागील 2023-24 च्या हंगामात राज्यस्तरीय आमंत्रितांच्या (सिनियर इन्व्हिटेशन लीग) टी-20 क्रिकेट स्पर्धेत वरिष्ठ खुल्या गटात खेळताना 3 सामन्यात 184 च्या स्ट्राइक रेटनं एकूण 164 धावा काढल्या. याच हंगामात इंदोर इथं झालेल्या बीसीसीआयच्या 19 वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघानं बलाढ्य मुंबई संघावर 115 धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवलं. बीसीसीआयच्या या विनू मंकड करंडक स्पर्धेत साहिल पारखनं 9 डावांत 2 शतकं व एका अर्धशतकासह 366 धावा काढल्या. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर साहिलची 19 वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती. बीसीसीआयची ही 19 वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धा 3 ते 9 नोव्हेंबेर दरम्यान गुवाहाटी इथं झाली. त्याआधी 16 वर्षांखालील आमंत्रितांच्या साखळी (इन्व्हिटेशन लीग), स्पर्धेतील जोरदार कामगिरीमुळं 16 वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून खेळताना बीसीसीआय विजय मर्चंट ट्रॉफीतही साहिलनं आपल्या आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. त्यात सुरत इथं खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात साहिलनं केवळ 149 चेंडूत 35 चौकार व 4 षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद 224 धावा फटकावल्या होत्या व नंतर आसाम विरुद्ध अर्धशतक केलं होतं.