मुंबई Indian Street Premier League : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत बुधवारी टेनिस बॉल टी-20 क्रिकेट टूर्नामेंट अर्थात 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग'च्या पहिल्या हंगामातील टीमच्या लिलावाचे निकाल जाहीर झाले. यावेळी सचिन तेंडुलकरनं आपल्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
लहानपणीच मिळाले स्ट्रेट ड्राइव्हचे धडे : सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये चॅलेंज कसं स्वीकारायचं आणि आपल्या खेळावर लक्ष कसं केंद्रित करायचं, याविषयी मार्गदर्शन केलं. सचिन म्हणाला की, आम्ही जेथे राहात होतो तेथे आम्हाला इमारतीच्या मधोमध खेळावं लागायचं. असा एकही दिवस जात नव्हता, ज्या दिवशी कोणाच्या खिडकीच्या काचा फुटल्या नाहीत. मात्र मला घरातून प्रोत्साहन मिळत होतं. मला मोठा भाऊ अजित यानं खूप मदत केली. सचिन तेंडुलकर हा त्याच्या स्ट्रेट ड्राइव्ह शॉटसाठी ओळखला जातो. या शॉटची सवय त्याला या दरम्यान लागल्याचं सचिननं सांगितलं.
करिअरची सुरुवात टेनिस बॉलनं झाली : पुढे बोलताना सचिन म्हणाला की, त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात टेनिस बॉलनं झाली. त्याला त्याच्या बहिणीनं पहिली बॅट दिली होती. सचिन शिवाजी पार्क येथे क्रिकेटचा सराव करत असे. त्यावेळेस आचरेकर सर त्याला मार्गदर्शन करत असत. सचिननं यावेळची एक आठवण सांगितली. सचिन म्हणाला की, "एकदा मी सराव सामन्यांमध्ये सलग दोनवेळा शून्यावर बाद झालो. त्यानंतरच्या सामन्यात मी एका रनावर बाद झालो. जेव्हा मी घराकडे निघालो होतो तेव्हा मला एक रन केल्याचा खूप आनंद झाला होता. त्या एका धावेनं माझी वाटचाल बदलली."