नवी मुंबई : नवी मुंबई शहरात आज आगरी कोळी महोत्सवाची नेरूळ येथील रामलीला मैदानात सुरुवात झाली आहे. या महोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. विरोधकांची मानसिकता खालावली आहे, त्यामधून अशी वादग्रस्त विधानं करण्यात येत आहेत. मात्र महाराष्ट्रात अशी विधानं करणं शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
वैचारिक पातळी खालावलेली भाषा महाराष्ट्राला रुचत नाही : आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे हे "पुरुष XX आहेत," असा आरोप केला होता. उत्तम जानकरांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निषेध केला. "अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही. वैचारिक पातळी खालावल्यानं अशा प्रकारची पातळी सोडून भाषा वापरली जाते," असंही रुपाली चाकणकर यांनी म्हणत आपला संताप व्यक्त केला.
मानसिकता खालवल्यानं इतर गोष्टींवर परिणाम : विरोधकांनी विरोध करावा, मात्र पातळी सोडून हा विरोध करू नये. वैचारिक मानसिकता खालवल्यानं त्याचा इतर गोष्टींवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधानं लोकप्रतिनिधी किंवा इतर कोणीही टाळणंच योग्य आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्यांसाठी रूपाली चाकणकर यांनी असंही म्हटलं की, "कोणताही आरोप केला की तो आरोप सिद्ध करणं महत्त्वाचं असते. जोपर्यंत तो आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्या गोष्टीवर बोलणं चुकीचं ठरते. आरोप सिद्ध झाल्यानंतरच त्या गोष्टीवर बोलणं योग्य असते," असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या. "या गोष्टीवर जर महाराष्ट्रात राजकारण होत असेल, तर ते चुकीचं आहे. व्यक्तीला न्याय देणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण कोणी करू नये," असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.
हेही वाचा :
- अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही पहिल्या दिवसापासून आम्हा सर्वांची इच्छा- रुपाली चाकणकर
- लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज; प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन कक्षासाठी प्रयत्न करणार - रुपाली चाकणकर - Premarital counseling
- "घटनांमध्ये होणारी वाढ पाहता जागरुक राहा,"- बदलापूर घटनेनंतर रुपाली चाकणकरांचा पालकांना सल्ला - Minor Girls Sexual Assault Case