India T20 World Cup Champion : भारताने 29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. यासह भारताने 17 वर्षांचा टी-20 विश्वचषक ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि 11 वर्षांची आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षाही संपवली. या विजयानंतर संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण असून प्रत्येकजण संघाचे अभिनंदन करत आहे. सचिन तेंडुलकर ते सौरव गांगुलीपर्यंत सर्वांनीच भारताला विजयानंतर अभिनंदन केलं आहे.
सचिन तेंडुलकरने सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करत संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अभिनंदन करताना त्याने संघातील काही खेळाडूंची विशेष करून नावं घेतली आहेत. त्यात कर्णधार रोहित शर्मा आहे, किंग कोहलीही आहे. त्याचवेळी मालिकावीराचा किताब मिळवणारा बुमराहदेखील आहे. सचिनने लिहिलं, "टीम इंडियाच्या जर्सीवर समाविष्ट होणारा असा प्रत्येक स्टार भारतातील उद्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीला त्यांच्या डोळ्यांमधली ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बळ देणारा आहे. भारतानं विश्वविजयाचा चौथा स्टार या विजयानं मिळवला आहे. टी-20 वर्ल्डकपमधला भारतासाठीचा दुसरा स्टार”, असं म्हणत सचिन तेंडुलकरनं संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. तेंडुलकरने पुढे लिहिले, "2007च्या एकदिवसीय विश्वचषकातील आमच्या सर्वात वाईट कामगिरीपासून ते 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकण्यापर्यंत. माझा मित्र राहुल द्रविडसाठी खूप आनंद झालाय. हा टी-20 विश्वचषक जिंकण्यात त्याचं योगदान आहे. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.
कॅप्टन कूल एमएस धोनीनं टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. धोनीने भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा फोटो पोस्ट केला. कॅप्शनमध्ये लिहिलं की "वर्ल्ड कप चॅम्पियन 2024. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. पण तुम्ही शांत राहुन, स्वत:वर विश्वास ठेवून आणि तुम्ही करून दाखवलं. मायदेशी असलेल्या आणि जगात जिथे कुठे असतील, त्या सर्व भारतीयांकडून तुमचे धन्यवाद की तुम्ही वर्ल्ड कप भारतात आणत आहात. अभिनंदन. अरे हा आणि वाढदिवसाची अमुल्य भेट दिल्याबद्दलही आभार."
- "टी20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला संघ चॅम्पियन ठरला,” असं व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले.
- "आम्ही चॅम्पियन आहोत!" असं लिहित फिरकीपटू आणि 2011 चा विश्वचषक विजेता रविचंद्रन अश्विनने आनंद व्यक्त केलाय.
- भारताचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी लिहिले, “अभिनंदन टीम इंडिया! अद्भुत विजय."
- "ये मेरा इंडिया. आम्ही चॅम्पियन बनलो. तुमचा खूप अभिमान आहे, असं माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं म्हटलं.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही संघाचे अभिनंदन केले. बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले , "रोहित आणि त्याच्या संघाचे अभिनंदन. त्यांनी किती छान सामना जिंकला आहे. विश्वचषक 11 वर्षांनंतर आला आहे. पण भारतामधील अनेक प्रकारची प्रतिभा पाहता भारतात आणखी विश्वचषक येतील. किती अभिमानाचा क्षण आहे."
हेही वाचा
- टीम इंडियाला दुहेरी झटका; विराटनंतर 'हिटमॅन'ची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - Rohit Sharma Retirement
- शाब्बास! ऐतिहासिक विजयाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांकडून भारतीय संघाचं अभिनंदन - T20 World Cup 2024 Final
- क्रिकेटप्रेमींचा नादच खुळा; विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत मरीन ड्राईव्हसह विविध ठिकाणी एकच जल्लोष, पहा व्हिडिओ - T20 World Cup 2024
- भारतीय संघाच्या आनंदावर विरजण; अंतिम सामन्यानंतर कोहलीचा टी-20 क्रिकेटला अलविदा - Virat Kohli T20 Retirement