सिडनी Rohit Sharma Out From Squad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं 2024 साली T20 विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांनी ज्या खेळाडूला महान खेळाडूचा दर्जा दिला होता. आज त्याच खेळाडूची कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो, असं दिसतंय. रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे, पण ऑस्ट्रेलियाच्या सततच्या फ्लॉपमुळं त्यानं पाचव्या टेस्ट मॅचमध्ये स्वतःला विश्रांती दिली. प्रत्येक भारतीय चाहत्यासाठी हा मोठा धक्का होता. या सगळ्यात रोहित शर्मा केवळ प्लेइंग 11 मधूनच बाहेर नाही तर तो भारतीय संघातूनही बाहेर झाला आहे.
रोहित शर्मा संघाबाहेर : वास्तविक, कोणताही क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघ आपापली टीम शीट तयार करतात. ज्यात प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंशिवाय संघातील इतर खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. सिडनी कसोटीपूर्वीही असंच घडलं. दोन्ही संघांनी आपापली टीम शीट जाहीर केली. यात भारतीय संघाच्या टीम शीटमध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहित शर्माचं नाव त्यात नव्हतं. विश्रांती घेतलेल्या खेळाडूचे नाव टीम शीटच्या बाहेर असल्याचं यापूर्वी कधीही घडलं नाही. तसंच टीम शीटमध्ये कर्णधाराचं नाव न राहिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.