विशाखापट्टणम Rishabh Pant : आयपीएल 2024 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स संघानं 4 पैकी 3 सामने गमावल्यानं त्यांची गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरण झालीय. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीला 106 धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. सामना गमावल्यानंतर आयपीएलमध्ये दिल्लीची स्थिती वाईट आहे. अशातच बीसीसीआयनं आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत दंडही ठोठावला आहे.
चारपैकी दोन सामन्यांत ऋषभ पंतला दंड : आयपीएलच्या या मोसमात सलग दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटमुळं ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसलाय. बुधवारी केकआर विरुद्ध झालेल्या सामन्यात स्लो-ओव्हर रेटमुळं दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला 24 लाख रुपये, तर दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना (6 लाख किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम यापैकी जे कमी असेल) दंड ठोठावण्यात आला. आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर बीसीसीआयनं कर्णधार ऋषभ पंत आणि संपूर्ण दिल्ली कॅपिटल्स संघाला हा दंड ठोठावलाय. पंतनं दुसऱ्यांदा आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केलंय. विशेष म्हणजे यापूर्वी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही स्लो ओव्हर रेटमुळे पंतला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.