कोलकाता New Captain of LSG :आगामी 21 मार्चपासून IPL 2025 आयोजित केलं जाईल. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी, सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावं जाहीर करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज संघानं श्रेयस अय्यरला आपला कर्णधार बनवलं. दरम्यान, आता लखनऊ सुपर जायंट्स संघानंही आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंत संघाचा नवा कर्णधार असेल. येत्या हंगामात तो एलएसजी संघाचं नेतृत्व करेल. लखनऊ सुपर जायंट्सनं त्याला लिलावात 27 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली होती. ऋषभ पंतनं यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचंही नेतृत्व केलं होतं.
राहुल होता मागील कर्णधार :लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल 2022 पासून खेळत आहे. 2022, 2023 आणि 2024 मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व केएल राहुलनं केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला, परंतु 2024 मध्ये त्यांचा संघ तसं करु शकला नाही. मेगा लिलावापूर्वी लखनऊनं केएल राहुलला रिटेनही केलं नव्हतं. केएल राहुल पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल. यावेळी लखनऊ संघ नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराकडून खूप अपेक्षा असतील.