लाहोर England Cricket Team : सध्या सुरु असलेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. गोलंदाजीचा अष्टपैलू खेळाडू ब्रायडन कार्स दुखापतीमुळं संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं त्याच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे, ज्याला आयसीसीनंही मान्यता दिली आहे.
पहिल्या सामन्यात ठरला महागडा : पायाच्या दुखापतीमुळं ब्रायडन कार्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. कार्स शेवटच्या सामन्यात खेळला होता, ज्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं 5 गडी राखून पराभूत केलं होतं. त्या सामन्यात कार्सनं 7 षटकं गोलंदाजी केली, ज्यात त्यानं 1 विकेट घेतली. मात्र गोलंदाजीत तो थोडा महागडा असल्याचं सिद्ध झाले. त्यानं 9.86 च्या इकॉनॉमी रेटनं 69 धावा दिल्या.
भारताविरुद्ध होता संघात : तसंच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत दौऱ्यावर ब्रायडन कार्सनं 5 पैकी 4 T20 सामने खेळले. मात्र त्याला 3 पैकी फक्त 1 वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या जागी जेमी ओव्हरटनला संधी मिळाली होती. आता कार्स स्पर्धेतून बाहेर झाल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पुढील सामन्यात ओव्हरटनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं.
ब्रायडन कार्सच्या जागी कोणाची संघात निवड : ब्रायडन कार्सच्या जागी लेग स्पिन गोलंदाज रेहान अहमदचा इंग्लंडचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीनंही त्याला मान्यता दिली आहे. 20 वर्षीय रेहान अहमदनं यापूर्वी इंग्लंडकडून 6 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर 10 विकेट्स आहेत.