चेन्नई R Ashwin Retirement : भारतीय दिग्गज क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्ती घेतल्यानंतर तो आता भारतात परतला आहे. पण, निवृत्तीनंतर असं काय घडलं, ज्यामुळं मला हृदयविकाराचा झटका आला असता असं अश्विननं सांगितलं. अश्विननं त्याची कॉल हिस्ट्री पाहून हे सांगितलं आहे. त्यानं आपली कॉल हिस्ट्रीही जगासमोर ठेवली आहे. प्रश्न असा आहे की, अश्विननं निवृत्तीनंतरच्या कॉल लॉगमध्ये वेगळं काय पाहिले?
कॉल हिस्ट्री पाहून अश्विनला धक्का का बसला? :निवृत्तीनंतरच्या कॉल लॉगमध्ये अश्विनला चकित करणारी गोष्ट म्हणजे त्याला मोठ्या नावांकडून आलेले कॉल. अश्विनच्या निवृत्तीनंतर त्याच्या वडिलांनी त्याला नक्कीच फोन केला. पण त्यांच्या व्यतिरिक्त त्याला सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचे फोन आले. कपिलनं अश्विनला व्हॉट्सॲपवर कॉल केला.
मला हृदयविकाराचा झटका आला असता :निवृत्तीनंतर अश्विनही सचिन आणि कपिलसारख्या निवृत्त क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. त्याच्या सोशल मीडियावर कॉल हिस्ट्री शेअर करताना अश्विननं लिहिलं, 'जर कोणी मला 25 वर्षांपूर्वी सांगितलं असतं की माझ्याकडे एक स्मार्टफोन आहे, ज्याचा कॉल लॉग माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी असा दिसणार आहे, तर तेव्हा मला हृदयविकाराचा झटका आला असता यासाठी मी सचिन आणि कपिलजींचे आभार मानू इच्छितो.'
गाबा कसोटीनंतर अश्विन निवृत्त : अश्विननं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 765 विकेट्स घेतल्या आहेत. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विननं फक्त एकच सामना खेळला, ज्यात त्यानं 1 बळी घेतला. पर्थ इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर ॲडलेडमध्ये अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये आला पण ब्रिस्बेनमधील पुढच्या कसोटीतून त्याला पुन्हा वगळण्यात आले. गाबा इथं खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीनंतर अश्विननं निवृत्ती जाहीर केली.
हेही वाचा :
- 'निवृत्ती घेण माझ्यासाठी दिलासा आणि...'; भारतात परतताच अश्विनचं मोठं वक्तव्य
- विराट कोहलीला राग अनावर, विमानतळावरच महिला पत्रकाराशी वाद; पाहा व्हिडिओ
- 4,4,4,4,6,4,4... स्मृतीनं लगावल्या सात चेंडूत 7 'बाउंड्री'; केला नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड'