वेलिंग्टन Adelaide and Wellington Test : सध्या कसोटी क्रिकेटमध्ये तीन मोठ्या मालिका सुरु आहेत. त्यापैकी एक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात, दुसरी मालिका न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध आणि तिसरी मालिका दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्ध खेळली जात आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेड कसोटी सामना आणि न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्यात चाहत्यांनी एक अशी घटना पाहिली ज्यावर विश्वास बसणार नाही. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळले जात असताना अशी घटना घडणं फारच दुर्मिळ आहे, पण ॲडलेड आणि वेलिंग्टन या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये चाहत्यांना हे पाहायला मिळालं.
राहुल आणि विल्यमसन दोघंही नो-बॉलमुळं नाबाद :भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. यानंतर राहुल अत्यंत सावधपणे खेळताना दिसला पण जेव्हा त्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर आलेला स्कॉट बोलँडचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे गेला. यानंतर तिसऱ्या पंचानं नो-बॉल घोषित केल्यावर राहुल पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला होता. राहुल अशा प्रकारे वाचला तेव्हा भारतीय वेळेनुसार सकाळी 10:12 वाजले होते. याच्या अवघ्या 12 मिनिटांपूर्वी, वेलिंग्टन कसोटी सामन्यातही अशीच घटना घडली होती, जिथं केन विल्यमसन देखील ब्रेडन कार्सनं बाद केल्यानंतर नो-बॉलमुळं बचावला होता.