मेलबर्न Pat Cummins Creates New World Record : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात असलेला बॉक्सिंग-डे कसोटी सामना सध्या अतिशय रोमांचक स्थितीत आहे, ज्यात यजमान ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 340 धावांचं लक्ष्य दिलं आहे. या सामन्यात कांगारु संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं रोहित शर्माची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहित शर्मानं सलग दुसऱ्यांदा विकेट गमावली. कमिन्सनं रोहितला केवळ 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
पॅट कमिन्सनं कर्णधार म्हणून कसोटीत केला नवा विक्रम : कसोटी क्रिकेटमध्ये असं क्वचितच घडतं, जेव्हा एका संघाच्या कर्णधारानं त्यांच्या विरोधी संघाच्या कर्णधाराची विकेट घेतली, परंतु जेव्हा बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पॅट कमिन्सनं रोहित शर्माची विकेट घेतली, यासह त्यानं कर्णधार म्हणून सहाव्यांदा रोहित शर्माची विकेट घेतली आहे, ज्यामध्ये रोहितनं त्यावेळी भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. हा देखील कसोटी क्रिकेटमधला एक नवीन विश्वविक्रम आहे कारण याआधी रिची बेनोडनं टेड डेक्सटरला 5 वेळा आपला बळी बनवला होता ज्यात दोघंही आपापल्या संघाचे कर्णधार होते.