पॅरिस Paris Olynmpics 2024 Shooting : भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी त्यानं पात्रता स्पर्धेत सातवं स्थान मिळवत टॉप 8 मध्ये स्थान मिळवलं आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. याशिवाय, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात स्टैंडिंग पोजीशन चुकली आणि परिणामी तो 11व्या स्थानावर राहिला. यात पहिल्या आठमध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्वप्नीलचा अंतिम सामना गुरुवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता होईल. राज्यासह देशाला त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.
कसं मिळवलं अंतिम फेरीत स्थान : स्वप्नीलनं गुणांच्या बाबतीत सातत्य दाखवत प्रत्येक सिरीजमध्ये 99 गुण मिळवले. त्यानं 13 वेळा आतील 10 रिंग्ज (X- इनर 10 रिंग) मारल्या. नीलिंग स्टेजनंतर स्वप्नील सहाव्या स्थानावर होता. तोच नीलिंग स्टेजनंतर ऐश्वर्यनं पहिल्या सिरीजमध्ये 98 गुण आणि दुसऱ्या सिरीजमध्ये 13Xसह 99 गुण मिळवत नववं स्थान पटकावलं. प्रोन पोझिशन फेरीनंतर, हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता ऐश्वर्यनं सहावं स्थान पटकावलं होतं, तर स्वप्नील दहाव्या स्थानावर घसरला होता. ऐश्वर्यनं प्रोन पोझिशनमध्ये त्याची लय कायम ठेवली आणि पहिल्या सिरीजमध्ये अचूक 10 निशाणे मारले. त्यानं या टप्प्यावर 199 गुण मिळवले, ज्यामध्ये 12 आतील 10-रिंग निशाण्यांचा समावेश होता. ज्यामुळं तो पहिल्या आठमध्ये पोहोचला. स्वप्नीलनं 13 आतील 10 रिंग निशाण्यांसह 197 गुण मिळवले.