पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या दिवशी (27 जुलै) भारतीय नेमबाजांची कामगिरी निराशजनक राहिली. सरबजोत सिंग आणि अर्जुन सिंग चीमा पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम फेरीत प्रवेश करु शकले नाहीत. अव्वल आठ नेमबाजांना अंतिम स्पर्धेत स्थान मिळालं. सरबजोतनं एकूण 577 गुणांसह पात्रता फेरीत नवव्या, तर अर्जुन 574 गुणांसह 18व्या स्थानावर आहे.
थोडक्यात अंतिम फेरीची हुलकावणी : आठव्या स्थानासह फायनलमध्ये पोहोचलेल्या जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरचाही स्कोअर 577 होता. परंतु त्यानं सरबजोतच्या 16 च्या तुलनेत 17 अचूक निशाणे लावले. चौथ्या मालिकेत अचूक 100 धावा केल्यावर सरबजोत पहिल्या तीनमध्ये पोहोचला होता. परंतु 22 वर्षीय सरबजोत सिंग कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरला आणि त्याचं अंतिम फेरीतील स्थान कमी फरकानं हुकलं. अर्जुन चीमाही एकवेळ चौथ्या स्थानावर पोहोचला होता. पण त्यालाही ही लय कायम राखता आली नाही. चीमा आणि सरबजोत हे दोघंही गेल्या वर्षी हँगझोऊ इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते.