पॅरिस Paris Olympics 2024 Rowing : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रोइंगमध्ये रविवारी बलराज पनवारनं इतिहास रचला आहे. पुरुष एकेरीच्या स्कल्स उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पॅरिस 2024 मधील भारताचा एकमेव रोवर बलराज पनवारनं रविवारी पुरुष एकेरी स्कल्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानं मोनॅकोच्या क्वेंटिन अँटोगानेलीच्या मागं 7:12:41 च्या वेळेसह दुसरं स्थान पटकावलं. त्यांच्या रिपेचेज गटातील इतर 3 स्पर्धक उपांत्य फेरीत E/F पर्यंत पोहोचले.
मंगळवारी होणार उपांत्यपूर्व फेरीचा सामना : पहिलंच ऑलिम्पिक खेळत असलेला बलराज पनवार आता मंगळवारी पुरुष एकेरी स्कल्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. हा सामना 30 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.40 वाजता खेळवला जाईल.
बलराजला इतिहास घडवण्याची संधी : बलराजला आता ऑलिम्पिक इतिहासातील कोणत्याही ऑलिम्पिक रोइंग स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याची संधी असेल. हा विक्रम सध्या पुरुषांच्या लाइटवेट दुहेरी स्कल्स जोडी अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील त्यांच्या स्पर्धेत 11 वं स्थान मिळविलं होतं.