पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघानं शानदार विजयासह पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात केली. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघानं शनिवारी इथं न्यूझीलंडविरुद्ध ब गटातील सामन्यात 3-2 असा दणदणीत विजय नोंदवला. भारताकडून मनदीप सिंग (23व्या मिनिटाला) आणि विवेक सागर प्रसाद (34व्या मिनिटाला) यांनी गोल केले. त्याचवेळी न्यूझीलंडकडून लेन सॅम (8व्या मिनिटाला) आणि सायमन चाइल्ड (53व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
हरमनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर भारतानं मिळवला विजय : भारताला 59व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, जो भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं गोल पोस्टमध्ये टाकला आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या सामन्यात भारताचा विजय सुनिश्चित केला. चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना झाला. न्यूझीलंडच्या सायमन चाइल्डनं 53व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर शॉटच्या रिबाऊंडवर अप्रतिम गोल करत भारतीय चाहत्यांना घाबरवलं आणि सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
पहिला क्वार्टर न्यूझीलंडच्या नावावर : सामन्याचा पहिला क्वार्टर न्यूझीलंडच्या नावावर होता. त्यांनी सामन्याची सुरुवात आक्रमक शैलीत केली. पहिल्या हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत किवी खेळाडूंनी भारतीय बचावपटूंना अनेक वेळा चकवा दिला. खेळाच्या 8व्या मिनिटाला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो लेन सॅमनं गोल पोस्टमध्ये टाकून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात भारताला अनेक संधी मिळाल्या मात्र गोल करण्यात अपयश आलं.
मनदीप सिंगचा शानदार गोल : भारतानं दुसऱ्या क्वार्टरला वेगवान सुरुवात करुन न्यूझीलंडवर दडपण आणण्यास सुरुवात केली. भारताचा स्टार फॉरवर्ड मनदीप सिंग योग्य वेळी योग्य स्थितीत आला आणि त्यानं शानदार गोल करुन आपल्या संघाला न्यूझीलंडविरुद्ध बरोबरी साधण्यास मदत केली. 23व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगचा फटका न्यूझीलंडच्या गोलकीपरनं वाचवला, पण मनदीपनं रिबाउंडवर गोल करत 8 वेळा सुवर्णपदक विजेत्याला सामन्यात परत आणलं.
हेही वाचा :
- बॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका; सात्विक-चिरागची विजयी सुरुवात, यजमानांचा सरळ सेटमध्ये पराभव - Paris Olympics 2024