पॅरिस Paris Olympics 2024 Hockey : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं उपांत्यपूर्व सामन्यात ग्रेट ब्रिटनचा पराभव करत आता उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय हॉकी संघाकडून देशाला पदकाची अपेक्षा आहे.
शूट आउटमध्ये भारताचा विजय : सामन्याच्या पूर्णवेळेपर्यंत दोघांची 1-1 अशी बरोबरी होती. भारताकडून हरमनप्रीत सिंगनं (22 व्या मिनिटाला) गोल केला. त्याचवेळी ग्रेट ब्रिटनसाठी ली मॉर्टननं (27व्या मिनिटाला) गोल केला. यानंतर सामना शूटआऊटमध्ये गेला. यानंतर भारतानं रोमहर्षक शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला. हरमनप्रीत सिंगनं शूटआऊटमध्ये भारतासाठी पहिला गोल केला. दुसरा गोल सुखजित सिंगनं केला. तर तिसरा गोल ललितकुमार उपाध्यायनं केला.
पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनचं वर्चस्व : या सामन्यात ग्रेट ब्रिटननं आक्रमणानं सुरुवात केली. परिणामी, त्यांना केवळ 45व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचा भारतानं चांगला बचाव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये बहुतांश वेळ चेंडूवर ब्रिटीश खेळाडूंचा ताबा होता. यात भारताला काही संधी मिळाल्या ज्याचा फायदा भारताला करता आला नाही. या क्वार्टरमध्ये भारतानं बचावात्मक खेळ केला आणि अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशनं काही शानदार सेव्ह केले. 13व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्यावर कर्णधार हरमनप्रीत सिंगचा गोल चुकला. पहिल्या क्वार्टरचा शेवट 0-0 असा झाला.
हाफ टाइममध्ये भारताचा स्कोअर 1-0 : 18व्या मिनिटाला भारताचा स्टार बचावपटू अमित रोहिदासला लाल कार्ड दाखविण्यात आल्यानं त्याला मैदान सोडावं लागलं. याचा अर्थ भारताला संपूर्ण सामना 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळावा लागला. यानंतर भारतीय संघानं अधिक ताकदीनं खेळ करत 22व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं या संधीचा फायदा घेत शानदार गोल करत भारताला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 27व्या मिनिटाला ब्रिटनच्या ली मॉर्टननं अप्रतिम मैदानी गोल करत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. हाफ टाइमपर्यंत 1-1 अशी बरोबरी होती.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनचं पारडं जड : तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतावर ग्रेट ब्रिटनचं वर्चस्व होतं. ब्रिटनला पेनल्टी कॉर्नरसह गोल करण्याच्या अनेक महत्त्वाच्या संधी मिळाल्या, पण भारताच्या भक्कम बचावामुळं ब्रिटनचे सर्व हल्ले अपयशी ठरले. ग्रेट ब्रिटननं या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ दाखवला. त्याचवेळी भारतीय संघ बचावात्मक अवस्थेत दिसत होता. मात्र, तिसरा क्वार्टर गोलशून्य राहिला आणि स्कोअर लाइन 1-1 असा संपला.
चौथा क्वार्टरही रोमांचक : भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील चौथा क्वार्टर अतिशय रोमांचक होता. या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना 1-1 ग्रीन कार्ड मिळालं. म्हणजे दोन्ही संघांना 2-2 मिनिटं 1 खेळाडू कमी खेळावा लागला. दोन्ही संघांनी एकमेकांवर अनेक हल्ले केले पण ते अपयशी ठरले. ब्रिटननं अनेक धोकादायक हल्ले केले पण भारताच्या वॉल श्रीजेशनं ते सर्व हाणून पाडले आणि ब्रिटनला 1-1 नं बरोबरीत रोखलं आणि सामना शूटआउटमध्ये गेला. यात भारतानं विजय मिळवला.
हेही वाचा :
- 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा कधी फेकणार पॅरिसमध्ये 'भाला'? कसा बघणार लाईव्ह सामना - Paris Olympics 2024
- भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियावर विजय; ऑलिम्पिकमध्ये 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड - Paris Olympics 2024