नई दिल्लीPrakash Padukone:पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. 10 दिवसांनंतरही भारताच्या खात्यात फक्त तीन कांस्यपदकं आहेत, जी नेमबाजीत आली आहेत. भारताला सोमवारी 22 वर्षीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनकडून पदकाची अपेक्षा होती, पण त्यालाही पराभवाचा सामना करावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत त्याला मलेशियाच्या ली जी जियाविरुद्ध 1-13, 16-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणाऱ्या पी. व्ही. सिधूंलाही यावेळी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी पॅरिसमधील खराब कामगिरीनंतर भारतीय बॅडमिंटनपटूंवर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले प्रकाश पदुकोण? :लक्ष सेन कांस्यपदकाच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर प्रकाश पादुकोण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "आता खेळाडूंनी जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. सध्याचे ऑलिम्पिक आणि मागील ऑलिम्पिक पाहिल्यास आपण सरकार आणि फेडरेशनला जबाबदार धरू शकत नाही. कारण फेडरेशनने आणि सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. जे काही तुमच्या गरजेचं होतं ते त्यांनी तुम्हाला दिलं. ते फक्त सुविधा देऊ शकतात. बाकी सर्व तुमच्या हातात आहे की, तुम्ही किती मेहनत करता आणि ते मैदानात कसं करून दाखवता. खेळाडूंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे."
आणखी किती करणार? :"तुम्ही त्या खेळाडूंना बाकीच्या इव्हेंटमध्ये पराभूत करत आहे, पण मोठ्या स्तरावर त्यांना पराभूत का करत नाही? हा प्रश्न खरं तर खेळाडूंनी स्वतःला विचारायला हवा की मी जी मेहनत घेताय ती योग्य आहे का? तेवढी मेहनत बरोबर आहे का? कारण जर तुम्ही तेवढी मेहनत पदक मिळवण्यासाठी ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर मोठ्या स्तरावर जाणं व्यर्थ आहे. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळा प्रशिक्षक, वेगळा डॉक्टर आणि बरंच काही सपोर्टिंग स्टाफ असं वेगवेगळे देण्यात आलं आहे. आणखी किती करणार? तुमच्यासाठी सरकार सर्व काही करत आहे. मला नाही वाटत की दुसरे कोणत्या देशांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात." असं प्रकाश पदुकोण म्हणाले.