क्वालालंपूर U19 Women's World Cup : पुढील महिन्यात 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमान पदाखाली ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे. मात्र यापुर्वीच त्यांच्या महिला संघ वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
विश्वचषकातून पाकिस्तान बाहेर : वास्तविक सध्या मलेशियाच्या भूमीवर 2025 चा महिला अंडर-19 T20 विश्वचषक आयोजित केला जात आहे. यात चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना प्रत्येकी चार गटात विभागण्यात आलं आहे. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-3 संघ सुपर-सिक्स फेरीसाठी पात्र ठरतील आणि प्रत्येक गटातील एक संघ बाहेर पडेल. यात पाकिस्तानी महिला संघाला त्यांच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. यामुळं पाकिस्तानी महिला संघ 2025 च्या अंडर-19 T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे आणि विजेतेपद जिंकण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे.
फलंदाजांची खराब कामगिरी : पावसामुळं प्रभावित झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड महिला संघानं 9 षटकांत 69 धावा केल्या. संघाकडून एलिस वॉल्सनं सर्वाधिक 31 धावांचं योगदान दिलं. यानंतर पावसामुळं पाकिस्तानी महिला संघाला डकवर्थ लुईस नियमांनुसार 73 धावांचं लक्ष्य मिळालं. पण पाकिस्तानी महिला संघाकडून एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि संपूर्ण संघ 9 षटकांत फक्त 59 धावाच करु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार कोमल खाननं सर्वाधिक 15 धावांची खेळी केली. गोलंदाज आणि फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं त्यांना सामना गमवावा लागला.