मुलतान PAK vs WI 1st Test Live Streaming : पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यात 17 जानेवारीपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज क्रिकेट संघ तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजनं 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटच्या वेळी पाकिस्तानचा दौरा केला होता.
WTC मध्ये शेवटची मालिका : हे दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या सायकलमध्ये त्यांची शेवटची मालिका खेळतील. तथापि, ही मालिका दोन्ही संघांना त्यांचा खेळ सुधारण्याची संधी देईल कारण दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शान मसूद पाकिस्तानचं नेतृत्व करेल. तर वेस्ट इंडिजची धुरा क्रेग ब्रेथवेटच्या खांद्यावर असेल.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 54 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात पाकिस्तानचा वरचष्मा दिसतो. पाकिस्ताननं 54 पैकी 21 कसोटी सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं फक्त 18 सामने जिंकले आहेत. यावरुन पाकिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.
1980 मध्ये जिंकली शेवटची मालिका : वेस्ट इंडिज 18 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जात असली तरी त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका जिकण्यात फारस यश आलेलं नाही. त्यांनी शेवटच्या वेळी डिसेंबर 1980 मध्ये झालेली 4 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 नं जिंकली होती. यानंतर त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर मालिका जिंकता आलेली नाही. म्हणजेच 45 वर्षांनंतर कॅरेबियन संघ पाकिस्तानमध्ये सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवार 17 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी होईल.