नाशिक : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर संशयित वाल्मिक कराड (Walmik karad) फरार झाला होता. यादरम्यान तो नाशिकच्या दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी होता, असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला. मात्र कराड आणि श्री स्वामी समर्थ केंद्राचा कुठलाही संबंध नाही, असा खुलासा श्री स्वामी समर्थ केंद्राकडून करण्यात आला आहे.
तृप्ती देसाई यांनी केला होता आरोप : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. अशात या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आणि त्याचा सहकारी विष्णू चाटे हा 15 आणि 16 डिसेंबरला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी होता. त्यानंतर सीआयडीचं पथक इथं येऊन गेलं. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, मात्र याबाबत त्यांनी माहिती लपवली, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला. तसेच यासंदर्भात श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख आण्णासाहेब मोरे उर्फ गुरुमाऊली यांच्यावर थेट महिलावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप करत लवकरच पुरावे सादर करू, असा दावा देसाई यांनी केला.
तृती देसाई यांच्या आरोपात तथ्य नाही : "श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखो भाविक येत असतात. त्यात कराड आले असतील, तर माहीत नाही. आमचा आणि त्यांचा कुठला ही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी सीआयडीचे पोलीस अधिकारी आमच्याकडं आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तसेच तृप्ती देसाई यांनी महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला, त्यात काही तथ्य नाही. लोकशाही आहे कोणी काहीही बोलू शकते. मागे आमच्या एका सेवेकऱ्याबाबत तक्रार होती. पण, त्यानंतर तक्रारदारानं माफी मागितली. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. आम्ही आमच्या उपक्रमात असतो. आमच्या संस्थेच्या वतीनं कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही कोणत्याही चौकशीसाठी सामोरं जाण्यास तयार आहोत", असं अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबा मोरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -