बीड : जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर गुरुवारी रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्या भावांची जमावानं हत्या केली आहे. या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. तर अजय भोसले आणि भरत भोसले असं या सख्ख्या भावांचं नाव आहे. याप्रकरणी संशयित सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.
दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील : अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकासोबत जुना वाद होता. अजय आणि भरत भोसले यांची गुरूवारी (16 जानेवारी) रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली. वाहिरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. तर हत्या करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील आहेत.
काय आहे घटना : आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले. तर दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे 9 ते 10 च्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी राॅड, धारदार शस्त्रानं हल्ला केला. या हल्ल्यात अजय भोसले, भरत भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
कोणत्या कारणावरुन केली हत्या : या घटनेतील आठ संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा खून का केला आणि कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजलं नाही. दोन्ही भावांचा मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, बाबासाहेब गर्जे, मनोजकुमार खंडागळे, भरत माने, बाबुराव तांदळे, लुईस पवार, दत्तात्रय टकले, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे अमोल शिरसाठ यांनी मोठ्या शिताफिने सात संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली.
हेही वाचा -