पर्थ Australia Collapse in 1st Innings :भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर पहिल्याच कसोटीत प्रतिस्पर्धी संघावर घरच्या मैदानावर हल्ला चढवला आहे. ऑस्ट्रेलियन संघ घरच्या मैदानावर खेळल्यास भारतीय संघावर दडपण येईल, अशी अपेक्षा होती, मात्र उलटंच होताना दिसत आहे. भारतीय संघाला फलंदाजीत फारसं काही करता आलं नाही, पण गोलंदाजीचा प्रश्न आला तेव्हा भारतीय गोलंदाज पुढे सरसावले आणि आपला खेळ दाखवला. जो दिवस ऑस्ट्रेलियन संघानं गेली आठ वर्षे मायदेशात पाहिला नव्हता, तो दिवस आज भारतासमोर पहावा लागला. एक प्रकारे हा ऑस्ट्रेलियासाठी लाजिरवाणा दिवस आहे.
जसप्रीत बुमराहनं घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय : भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ छोट्या धावसंख्येवर बाद झाला तेव्हा बुमराहचा निर्णय चुकल्याचं दिसत होतं. पण भारतीय गोलंदाजी येताच बुमराह बरोबर असल्याचं दिसलं. भारतीय संघ अवघ्या 150 धावा करु शकला असताना ऑस्ट्रेलियाने 40 धावा करण्यापूर्वीच आपल्या 5 विकेट गमावल्या. यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडत राहिल्या.
ऑस्ट्रेलियानं 40 धावापूर्वी गमावल्या 5 विकेट : जर आपण आकडेवारीबद्दल बोललो तर, 1980 नंतर ऑस्ट्रेलियन संघासोबत असं घडण्याची ही दुसरी वेळ आहे, जेव्हा संघ आपल्या घरी कसोटी सामना खेळत आहे आणि त्याच्या पहिल्या 5 विकेट 40 धावा होण्याआधीच गेल्या आहेत. याआधी 2018 साली दक्षिण आफ्रिकेनंही अशीच कामगिरी केली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं दक्षिण आफ्रिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली होती. तेव्हा होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ 17 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. भारतासमोर ऑस्ट्रेलियानं 38 धावांत 5 विकेट गमावल्या आहेत. दरम्यान, संघाची धावसंख्या 50 धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत त्यांची सहावी विकेटही गेली होती. तर दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारुंच्या 67 धावांवर 7 विकेट आहेत.
बुमराहची पहिल्याच षटकापासून आक्रमक गोलंदाजी : भारताची गोलंदाजी सुरु झाली तेव्हा जसप्रीत बुमराहनं आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त करण्यात बुमराहचा मोठा वाटा होता. त्यानं लागोपाठ तीन विकेट घेतल्या. त्यात स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचाही समावेश होता. मोहम्मद सिराजला दुसऱ्या टोकाकडून चांगली गोलंदाजी करता आली नाही, त्यामुळं कर्णधारानं गोलंदाजी हर्षित राणाकडे सोपवली. ट्रॅव्हिस हेडला बाद करुन त्यानं भारतीय संघाला मोठं यश मिळवून दिले. यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये सिराज पुन्हा आला तेव्हा त्यानं अचूक मारा करत दोन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर ढकललं.
हेही वाचा :
- 15 वर्षांनंतर करेबियन संघाविरुद्ध बांगलादेश विजय मिळवणार की वेस्ट इंडिज वर्चस्व राखणार? पहिला सामना 'इथं' पाहा लाईव्ह
- 6,6,4,6,6,6...युवा फलंदाजाचा कहर, एकाच ओव्हरमध्ये 34 धावा काढत ठोकलं वादळी अर्धशतक; पाहा व्हिडिओ
- नरेंद्र मोदी स्टेडियमपेक्षा 10 पटीनं महागडं आहे पर्थचं ऑप्टस स्टेडियम, किती आहे किंमत?