मेलबर्न Nitish Kumar Pushpa 2 Celebration :ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये केवळ दोन फलंदाजांच्या फॉर्मनं त्यांना सातत्यानं साथ दिली आहे. केएल राहुल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी सर्व सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणलं आहे. मेलबर्नमधील चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात राहुलची बॅट चालली नाही, पण नितीश रेड्डीनं भारतीय संघाला फॉलोऑनच्या धोक्यातून बाहेर काढलं. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये त्यानं आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं.
मोठ्या खेळीत रुपांतर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत नितीशला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर त्यानं सातत्याने चांगली खेळी खेळली होती, मात्र त्याला पन्नाशीचा टप्पा गाठता आला नव्हता. मेलबर्नमध्ये त्यानं थेट शतक झळकावत हा आकडा पार केला. विशेष म्हणजे त्यानं या खेळीदरम्यान 50 धावा करताच खास पद्धतीनं सेलिब्रेशन केलं. नितीशनं स्टार अभिनेता अल्लू अर्जुनची कॉपी करत त्याच्यासारखं सेलिब्रिशन करत हा क्षण साजरा केला.
अल्लू अर्जुन सारखं सेलिब्रेशन :'पुष्पा' चित्रपटातील अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध डायलॉग आहे, झुकेगा नहीं. हा संवाद बोलत असताना अल्लू अर्जुन आपले हात गळ्याखाली आणतो. नितीश रेड्डीनंही असंच काहीसं केलं. मात्र, त्याची सेलिब्रेशनची स्टाइल अल्लू अर्जुनपेक्षा थोडी वेगळी होती. नितीशनं हाताऐवजी गळ्याखाली बॅट आणली. हे पाहून स्टेडियममध्ये बसलेले भारतीय चाहते उत्साहित झाले.