ऑकलँड NZ vs SL 3rd ODI Live Streaming : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. यातील तिसरा आणि शेवटचा सामना 11 जानेवारी (शनिवार) रोजी ईडन पार्क ऑकलँड इथं खेळवला जाईल. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत मालिका 2-0 नं खिशात घातली आहे. त्यामुळं हा सामना जिंकत मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा कीवी संघाचा प्रयत्न असेल तर 10 वर्षांनंतर कीवींच्या भूमीवर सामना जिंकत प्रतिष्ठा राखण्याचा पाहुण्या श्रीलंकन संघाचा प्रयत्न असेल.
दुसऱ्या वनडेत काय झालं : न्यूझीलंड क्रिकेट संघानं बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. यासह त्यांनी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पावसामुळं तो सामना केवळ 37 षटकांचाच खेळवण्यात आला. त्यात प्रथम फलंदाजी करताना कीवी संघानं 9 गडी गमावून 255 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 142 धावांवर गडगडला. न्यूझीलंडसाठी, रचिन रवींद्रनं त्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि 63 चेंडूत 79 धावांची खेळी केली. यासाठी त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.
तीक्षनानं घेतली होती हॅटट्रिक : दुसऱ्या वनडे सामन्यात महिष तिक्षानानं या सामन्यात 8 षटकं टाकली आणि 44 धावांत एकूण 4 बळी घेतले. यात त्यानं हॅट्ट्रिकद्वारे 3 बळी घेतले. महिष तिक्षानाच्या हॅटट्रिकमध्ये अडकणारा पहिला फलंदाज न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर होता, जो 15 चेंडूत 20 धावा करुन बाद झाला. 34.5 व्या चेंडूवर सँटनरची विकेट घेतल्यानंतर तिक्षानानं 34.6 व्या चेंडूवर नॅथन स्मिथलाही बाद केलं. या दोन विकेट्सनंतर त्यानं आपल्या पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीला बाद करुन हॅटट्रिक पूर्ण केली. मात्र, त्याचा संघाला फारसा उपयोग झाला नाही.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एकूण 107 सामने खेळले गेले आहेत. यापैकी न्यूझीलंडनं 54 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेनं 43 वेळा विजय मिळवला आहे. 9 सामने निकालाशिवाय संपले, तर 1 सामना बरोबरीत राहिला. दोन्ही संघांमधील सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे, ज्यात कधी न्यूझीलंडनं वर्चस्व दाखवलं आहे तर कधी श्रीलंकेनं चमकदार कामगिरी केली आहे. वनडे फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांमधील हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी नेहमीच खास राहिला आहे.
2015 मध्ये जिंकला शेवटचा सामना : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1979 मध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला. यानंतर नेहमीच हे दोन्ही संघ एकमेकांच्या देशाचा दौरा करत आहेत. मात्र श्रीलंकेला न्यूझीलंडमध्ये वनडे सामना जिंकण्यासाठी संघर्ष कारावा वागत असल्याचं दिसत आहे. त्यांनी 31 डिसेंबर 2015 रोजी न्यूझीलंडमध्ये शेवटचा सामना जिंकला होता. त्यामुळं आता 10 वर्षांनंतर वनडे सामना जिंकण्यासाठी लंकन संघ मैदानात उतरणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं होणार आहे?