वेलिंग्टन New Zealand Cricket Team : वेलिंग्टन इथं शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडनंही आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. मागील महिन्यात भारतात झालेल्या किवींच्या मालिकेत 10 बळी घेणारा स्पेशलिस्ट फिरकीपटू मिचेल सँटनरचा संघात समावेश न करता यजमान संघानं चार वेगवान गोलंदाजांना कायम ठेवलं आहे.
पहिल्या सामन्यात इंग्लंडचा विजय :तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राईस्टचर्च इथं खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघानं 8 विकेटनं विजय मिळवला होता. त्या सामन्यात ब्रेडन कार्सनं गोलंदाजीत इंग्लंडसाठी चमकदार कामगिरी केली आणि 10 विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला. तसंच आपला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जेकब बेथलनंही आक्रमक अर्धशतक झळकावत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
इंग्लंडनंही जाहीर केली प्लेइंग 11 :या सामन्यासाठी इंग्लंडनं देखील आपल्या प्लेइंग 11 ची केली आहे. या सामन्यासाठी, इंग्लंड संघानं आपल्या प्लेइंग 11 बाबत मोठा निर्णय घेतला आहे, या सामन्यातही ऑली पोप यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे, तर जेकब बेथेलला पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणार आहे. इंग्लंड संघानं देखील आपल्या प्लेइंग 11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाही.
WTC मध्ये न्यूझीलंडला धक्का, भारताला फायदा :वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीसाठी सध्या 5 संघांमध्ये लढत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे WTC फायनलचे सर्वात मोठे दावेदार आहेत. या पाच संघांची शर्यत अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. प्रत्येक सामन्यासह टेबलमध्ये चढ-उतार असतात. इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळं न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. तथापि, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या किवी संघाचं कोणतंही नुकसान झालं नाही, परंतु त्याची टक्केवारी कमी होऊन श्रीलंकेच्या बरोबरीनं पाचव्या क्रमांकावर आहे. दोघांचे सध्या 50-50 टक्के गुण आहेत.