वेलिंग्टन New Zealand Squad Announced : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची कसोटी मालिका झाली. या मालिकेत पाहुण्या कीवी संघानं ऐतिहासिक कामगिरी करत भारताला 3-0 नं पराभूत केलंय. यानंतर आता न्यूझीलंडला श्रीलंका दौऱ्यावर दोन T20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं आपला संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यासाठी न्यूझीलंडनं अंतरिम कर्णधारही जाहीर केला आहे. वास्तविक, T20 विश्वचषक 2024 मध्ये न्यूझीलंडच्या खराब कामगिरीनंतर केन विल्यमसननं कर्णधारपद सोडलं होतं. यानंतर न्यूझीलंडची ही पहिलीच पांढऱ्या चेंडूची मालिका असणार आहे.
न्यूझीलंड संघाला मिळाला नवा कर्णधार : स्टार फिरकी अष्टपैलू मिचेल सॅंटनरला न्यूझीलंड संघाचा मर्यादित षटकांचा हंगामी कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्याचवेळी, न्यूझीलंडला या वर्षाच्या अखेरीस न्यूझीलंडच्या देशांतर्गत हंगामात पांढऱ्या चेंडूच्या संघासाठी कायमस्वरुपी कर्णधार मिळेल. या दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडनं कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यात त्यांना 0-2 नं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. विशेष म्हणजे भारताविरुद्ध एतिहासिक विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंड कसोटी संघाचा कर्णधार टॉम लॅथम याला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तोच दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या फिरकीवर भारतीय फलंदाजांना नाटवणाऱ्या मिचेल सॅंटनरला थेट संघाचं कर्णधारपद देण्यात आलंय.
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 09 नोव्हेंबर
- दुसरा T20 सामना : 10 नोव्हेंबर
- पहिला वनडे सामना : 13 नोव्हेंबर
- दुसरा वनडे सामना : 17 नोव्हेंबर
- तिसरा वनडे सामना : 19 नोव्हेंबर
या खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली संधी : न्यूझीलंडच्या संघात दोन युवा खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू नॅथन स्मिथ आणि यष्टिरक्षक फलंदाज मिच हे पहिल्यांदाच संघाचा भाग बनले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी काही काळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नॅथन स्मिथला मार्चमध्ये NZC डोमेस्टिक प्लेअर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला. त्याच वेळी, मिच हे या वर्षाच्या सुरुवातीला कँटरबरी पुरुष खेळाडू म्हणून निवडला गेला. याशिवाय विल यंग, मार्क चॅपमन, हेन्री निकोल्स, फिलिप्स, टिम रॉबिन्सन आणि जोश क्लार्कसन या स्टार फलंदाजांचीही या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे.