माउंट मौनगानुई NZ Beat SL 1st T20I : माउंट मौनगानुईच्या बे ओव्हल इथं खेळल्या गेलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील पहिल्या T20 सामन्यात पाहुण्या श्रीलंकन संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. श्रीलंकेसमोर विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य होते, मात्र अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात संघाला 8 गडी गमावून केवळ 164 धावा करता आल्या आणि न्यूझीलंडनं हा सामना 8 धावांनी जिंकला. धावांचा पाठलाग करताना एकवेळ श्रीलंकेच्या बिनबाद 121 धावा केल्या होत्या. मात्र यानंतर 43 धावांत 8 विकेट गेल्यानं त्यांना हातातला सामना गमवावा लागला. पथुम निसांकानं श्रीलंकेसाठी 60 चेंडूत 90 धावांची स्फोटक खेळी खेळली, पण त्याची खेळी काही कामी आली नाही. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार मारले.
कीवींची अडखळत सुरुवात : तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि 20 धावांवर पहिला धक्का बसला. संघ वारंवार अंतरानं विकेट गमावत होता. एकेकाळी यजमान संघ 65 धावांच्या धावसंख्येवर 5 विकेट गमावून संघर्ष करत होता, परंतु डॅरेल मिशेलच्या 62 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर आणि मायकेल ब्रेसवेलच्या 59 धावांच्या जोरावर त्यांनी 172 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.