Paris Olympics 2024 :भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा आता भाला फेकच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये 89.34 मीटर भाला फेकला आणि त्यानं थेट अंतिम फेरीत स्थान पटकावलं. पात्रता फेरीत नीरज चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याचबरोबर या मोसमातील देखील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरज आता सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. नीरज चोप्राच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. नीरज चोप्रानं पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना नीरज कडून सुवर्णपदकाची आशा आहे.
केवळ नीरज चोप्राच नाही तर पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यानेही पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी केली. अर्शद नदीमने 86.59 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि पाकिस्तानचे हे दोन खेळाडू अंतिम सामन्यात भिडताना दिसणार आहेत. पात्रता स्पर्धेत अव्वल 12 मध्ये स्थान मिळवणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
नीरज चोप्राची अंतिम फेरीची लढत कधी? :पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी, 8 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11:55 वाजता खेळवला जाईल. गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा सुवर्णपदकावर कब्जा करेल, अशी भारताला आशा आहे.
नीरज चोप्राने मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकलं होतं. तर जूनमध्ये फिनलंडमधील पावो नूरमी गेम्समध्ये 85.97 मीटर भाला फेकून त्यानं सुवर्णपदक पटकावलंय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टोकियो ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता जेकब वालॅच, अर्शद नदीम, ज्युलियन वेबर यांचं आव्हान असणार आहे.
हेही वाचा
- उपांत्य फेरीत भारत-जर्मनी यांच्यात कांटे की टक्कर, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी - Paris Olympics 2024
- "ऑलिम्पिकमध्ये मेहनत करत नसाल तर..", दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण बॅडमिंटनपटूंच्या खराब कामगिरीवर संतापले - Paris Olympics 2024
- 'मराठमोळ्या' अविनाश साबळेनं पॅरिस गाजवलं; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय - Paris Olympics 2024
- जर्मनीला हरवून भारत पुन्हा एकदा इतिहास रचणार, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांचं मत - PARIS OLYMPICS 2024