मुंबई Mumbai Indians Head Coach : IPL 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संघानं मार्क बाउचरच्या जागी महेला जयवर्धनेला पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनवलं आहे. मुंबई इंडियन्सनं रविवारी 13 ऑक्टोबर रोजी जयवर्धनेच्या पुनरागमनाची घोषणा केली. जयवर्धने यापूर्वी 2017 ते 2022 या सलग 6 हंगामांसाठी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक होता. परंतु गेल्या दोन हंगामात तो फ्रँचायझीच्या क्रिकेटच्या जागतिक प्रमुखाची भूमिका बजावत होता.
मार्क बाउचरची केली होती नियुक्ती : 2023 च्या हंगामापूर्वी मुंबईनं दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू मार्क बाउचरची हेड कोच म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्याच्या कार्यकाळात संघाची कामगिरी खूपच खराब होती. विशेषत: गेल्या मोसमात, हार्दिक पांड्याचं पुनरागमन आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकल्यानंतर निर्माण झालेला वाद संपूर्ण हंगामात फ्रँचायझीसाठी चर्चेत राहिला. मैदानावरील संघाच्या सततच्या खराब कामगिरीचा परिणाम असा झाला की, संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला.
तीन वेळा बनवलं विजेता :आता, मुंबई पुन्हा त्यांचे अनुभवी प्रशिक्षक महेला जयवर्धने याची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. जयवर्धने यापूर्वी 2017 ते 2022 या हंगामात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक होता. या काळात त्यानं 2017, 2019 आणि 2020 मध्ये संघाला तीन वेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मागच्या हंगामात निराशाजनक कामगिरी : IPL 2024 मुंबईसाठी खूप वाईट होतं. मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर होता. या मोसमात मुंबईनं एकूण 14 सामने खेळले आणि केवळ 4 सामने जिंकले. मुंबईला 10 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबई संघात अनेक मोठे खेळाडू होते. पण तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
हार्दिकचं कर्णधारपद जाणार : बाउचरच्या जागी जयवर्धनेचं पुनरागमन झाल्यामुळं फ्रँचायझीमधील सर्वात मोठा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. बाउचरनंतर हार्दिक पांड्या संघाचं कर्णधारपद गमावणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या मोसमात, बाउचर असताना हार्दिकला कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण त्यामुळं गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकला, तर रोहितनं या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवला भारताचा नवा T20 कर्णधार बनवण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझीही हार्दिककडून कर्णधारपद हिसकावून घेणार का? येत्या काही दिवसांत सर्वांच्या नजरा या प्रश्नाच्या उत्तराकडंच लागतील.
हेही वाचा :
- 22 षटकार, 26 चौकार... भारतीय संघाचं विक्रमी ऐतिहासिक 'सिमोल्लंघन'; आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 'असं' पहिल्यांदाच घडलं
- जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी बनला दिग्गज क्रिकेटपटू; रणजी-दुलीप ट्रॉफी याच राजघराण्याची देण
- 'मेगा लिलावात गेलो, तर विकला जाईल की नाही...?' ऋषभ पंतचा मध्यरात्री चाहत्यांना प्रश्न, दिल्ली संघ सोडणार?