मुंबई IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे, ज्यासाठी सर्व 10 संघांनी आधीच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघानं आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात बदल जाहीर केले आहेत. खरंतर, मुंबई इंडियन्स संघाचा एक भाग असलेला अल्लाह गझनफर दुखापतीमुळं आगामी आयपीएल हंगामाबाहेर आहे, ज्यात त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 4 आठवडे लागतील, अशा परिस्थितीत आता मुंबई इंडियन्सनं त्याच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे.
मुजीब उर रहमानचा संघात समावेश : आयपीएल 2025 च्या मेगा प्लेअर लिलावात, कोणत्याही संघानं अफगाणिस्तान संघाचान 23 वर्षीय फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानला संघात घेण्यास रस दाखवला नाही. आता, अल्लाह गझनफरच्या बाहेर पडल्यानंतर, मुंबई इंडियन्सनं त्याला त्यांच्या संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुजीब अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या अफगाणिस्तान संघाचाही तो भाग नाही. मात्र आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी मुजीब पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत तो संपूर्ण हंगामासाठी मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल.