वेलिंग्टन NZW vs AUSW 2nd ODI : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघामध्ये वनडे मालिका खेळवली जात आहे. शनिवारी 21 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या वनडेत न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज मॉली पेनफोल्डनं ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा कहर केला. ॲलिसा हिली आणि एलिस पेरी सारख्या खेळाडूही तिच्या घातक गोलंदाजीला बळी पडल्या. तिनं 10 षटकात केवळ 42 धावा देत 4 बळी घेतले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणणाऱ्या या 23 वर्षीय युवा खेळाडूचा जन्म न्यूझीलंडमध्ये नसून लंडन, इंग्लंडमध्ये झाला आहे.
पेनफोल्डसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पराभूत :न्यूझीलंडनं या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. कांगारु संघाची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार ॲलिसा हिलीनं 32 चेंडूत 34 धावा केल्या होत्या आणि संघाची धावसंख्या 43 पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर पेनफोल्डनं ऑस्ट्रेलियाला धक्के देण्यास सुरुवात केली. तिनं ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करुन आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिलं. यानंतर तिनं कांगारु संघाचा कणा मानल्या जाणाऱ्या एलिस पेरीला आपला बळी बनवलं. त्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज बेथ मुनीलाही आउट केलं. त्यामुळं कांगारु संघ अवघ्या 110 धावांत 4 विकेट गमावून अडचणीत सापडला.
फलंदाजालाही वाटलं आश्चर्य :पेनफोल्डच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडनं दोन भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यानंतर तिनं पुन्हा ताहिला मॅकग्रासोबत सदरलँडची अर्धशतकी भागीदारी मोडली. तिनं ताहिलाकडे बॉल अशा प्रकारे फेकला की तिलाही समजला नाही आणि तिला धक्काच बसला. पेनफोल्डनं फुल लेन्थ बॉल टाकला, जो कोनातून स्विंग झाला आणि ताहिलाची विकेट घेतली.