मुंबई IPL 2024 MI vs RCB : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं (MI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये विजयी मार्ग पकडलाय. गुरुवारी येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) वर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवलाय. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार फलंदाज इशान किशन यांच्याशिवाय सूर्यकुमार यादवही मुंबईच्या विजयाचा हिरो ठरलाय. सर्व प्रथम बुमराहनं 5 विकेट घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. यानंतर ईशान आणि सूर्यानं आक्रमक अर्धशतकं झळकावून संघाला विजय मिळवून दिला.
- आरसीबीचा परभवाचा पंचहार : मुंबईचा या हंगामातील 5 सामन्यांमधील हा दुसरा विजय आहे. या मोसमात या संघानं पहिले 3 सामने गमावले होते. पण आता त्यांनी सलग 2 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाचा हा 6 सामन्यांमध्ये पाचवा पराभव आहे.
मुंबईचा दणदणीत विजय : या सामन्यात मुंबईसमोर 197 धावांचं लक्ष्य होतं. त्याला प्रत्युत्तर देताना या संघानं 15.3 षटकांतच 3 गडी गमावून सामना जिंकला. मुंबईकडून सलामीवीर इशान किशननं 34 चेंडूत 69 धावांची आक्रमक खेळी केली. यात त्यानं 7 चौकार आणि 5 षटकारांचा तडाखा दिला. यानंतर सूर्यकुमार यादवनं अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक केलं. हे या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरलंय. तो 19 चेंडूत 52 धावा करुन बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. तर रोहित शर्मानंही 24 चेंडूत 38 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्यानं 6 चेंडूत 3 षटकार ठोकत नाबाद 21 धावा केल्या. आरसीबीचा कोणताही गोलंदाज फारसा प्रभावी ठरला नाही. तरीही आकाश दीप, विजयकुमार वैशाक आणि विल जॅक यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.