महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएलमध्ये 12 वर्षानंतर रोहितचं शतक, धोनीच्या सुपर खेळीनं चेन्नई ठरला किंग - MI vs CSK - MI VS CSK

IPL 2024 MI vs CSK : आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात शानदार सामना रंगला. या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा 20 धावांनी पराभव केलाय.

IPL 2024 MI vs CSK
आयपीएलमध्ये 12 वर्षानंतर रोहितचं शतक, मात्र 'मुंबईच्या राजा'ला इतर सहकाऱ्यांनी साथ न दिल्यानं मुंबईचा पराभव

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 7:35 PM IST

Updated : Apr 15, 2024, 6:56 AM IST

मुंबई IPL 2024 MI vs CSK : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात आपली चांगली कामगिरी सुरुच ठेवलीय. रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईनं मुंबई इंडियन्सचा (MI) घरच्या मैदानावर 20 धावांनी पराभव केला.

रोहितचं नाबाद शतक : या सामन्यात चेन्नईनं मुंबईला 207 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघानं 6 विकेट गमावत केवळ 186 धावाच केल्या. मुंबईसाठी रोहित शर्मानं 63 चेंडूत 105 धावांची नाबाद शतकी खेळी केली. हिटमॅन एका टोकाला उभा राहिला, पण दुसऱ्या बाजूनं एकही फलंदाजानं त्याला साथ दिली नाही. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानानं 4 बळी घेत संपूर्ण खेळच पलटवला. पाथीरानानं ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि रोमॅरियो शेफर्ड यांना बाद केलं. मुंबईकडून रोहितशिवाय तिलक वर्मानं 31 धावा केल्या. तर चेन्नईकडून पाथीराना व्यतिरिक्त तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

रोहितची एकाकी झुंज : सलामीवीर रोहित शर्मानं डावाच्या पहिल्याच चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मानं एकट्यानं अखेरपर्यंत लढा दिला. रोहित शर्मानं 63 चेंडूमध्ये नाबाद 105 धावांची खेळी केली. यात पाच षटकार आणि 11चौकारांचा समावेश होता. रोहित शर्मानं सलामीला ईशान किशनसोबत 70 धावांची भागिदारी केली. तर तिलक वर्मा याच्यासोबत 60 धावांची भागिदारी केली. याशिवाय एकही मोठी भागिदारी झाली नाही. त्यामुळं मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे रोहितनं आयपीएमध्ये 12 वर्षांनंतर शतक झळकावलंय. यापूर्वी त्यानं 2012 मध्ये दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध खेळताना त्यानं शतक केलं होतं.

गायकवाड आणि शिवमची आक्रमक फलंदाजी : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीलाठी आलेल्या चेन्नई संघाची खराब सुरुवात झाली. त्यांनी अवघ्या 8 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. सलामीला आलेला अजिंक्य रहाणे 5 धावा करुन झेलबाद झाला. मात्र त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडनं डावाची धुरा सांभाळत 33 चेंडूत अर्धशतक केलं. यानंतर शिवम दुबेनंही 28 चेंडूत आपलं अर्धशतक पुर्ण केलं. या सामन्यात गायकवाडनं 40 चेंडूत 69 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेनं 38 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. याशिवाय महेंद्रसिंग धोनीनं शेवटच्या षटकात तीन षटकारांसह 4 चेंदूतच 20 धावा केल्या. यामुळं चेन्नई संघानं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 206 धावा केल्या. मुंबई संघाच्या एकाही गोलंदाजाला भेदक गोलंदाजी करता आली नाही. मुंबईसाठी हार्दिक पांड्यानं 2 बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज गिराल्ड कोएत्झी आणि फिरकी गोलंदाज श्रेयस गोपालनं प्रत्येकी 1 बळी घेतला.

हेही वाचा :

  1. 'सेनापती' बदलूनही पंजाबच्या किंग्जचा 'रॉयल' पराभव; राजस्थानचा विजयी 'पंच' - PBKS vs RR
  2. कुलदीपनं रचलेल्या पायावर फ्रेझर-मॅकगर्कनं चढवला विजयी कळस; दिल्ली राजधानी एक्सप्रेस 'विजयी' रुळावर - LSG vs DC
Last Updated : Apr 15, 2024, 6:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details