डरबन Marco Jansen Equals 120 Years Old Record : यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डरबनमध्ये खेळला जात आहे. पहिला कसोटी सामना 27 नोव्हेंबर रोजी सुरु झाला ज्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 191 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात श्रीलंकेची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ केवळ 13.5 षटकांत 42 धावांत गारद झाला. 2 फलंदाज वगळता एकालाही दुहेरी आकडी धावसंख्या गाठता आली नाही तर 5 फलंदाज आपलं खातंही उघडू शकलं नाहीत. अशाप्रकारे श्रीलंकेच्या संघानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा लाजिरवाणा विक्रम केला. इतकंच नाही तर लंकेच्या नावावर गेल्या 100 वर्षात एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला.
1924 नंतर पहिल्यांदाच घडलं : खरं तर, गेल्या 100 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेनं सर्वात कमी चेंडूंचा सामना करुन ऑलआऊट होण्याचा लज्जास्पद विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी 1924 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात 75 चेंडूंचा सामना करताना केवळ 30 धावांपर्यंत मर्यादित होता. आता श्रीलंकेनं हा विक्रम मोडीत काढला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजानं रचला इतिहास : श्रीलंकेला 42 धावांत गुंडाळण्यात दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मार्को यान्सनचा मोठा वाटा होता, त्यानं एकट्यानं 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानं अवघ्या 6.5 षटकांत 13 धावा देत 7 बळी घेत कसोटी क्रिकेटच्या 100 वर्ष जुन्या महान विक्रमाची बरोबरी केली. यान्सननं अवघ्या 41 चेंडूत श्रीलंकेचे 7 फलंदाज बाद केले. यासह, कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वात कमी चेंडूत संयुक्तपणे 7 बळी घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला. त्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाज ह्यू ट्रंबलची बरोबरी केली. 1904 मध्ये ह्यू ट्रंबूलनं 41 चेंडूत कसोटी डावात इंग्लंडच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.