हॅमिल्टन Maheesh Theekshana Hat-Trick :श्रीलंकेचा फिरकीपटू महिष तिक्षानानं न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हॅट्ट्रिक घेतली आहे. हे काम त्यानं दोन षटकांत केलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात स्फोटक झाली. पण, त्यानंतर महिष तिक्षानाच्या दमदार गोलंदाजीमुळं श्रीलंकेनं सामन्यात बऱ्यापैकी पुनरागमन केलं. वनडे सामन्यात हॅट्ट्रिक घेणारा महिष तिक्षाना हा श्रीलंकेचा सातवा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो 2025 साली हॅटट्रिक घेणारा पहिला खेळाडूही ठरला आहे.
महिष तिक्षनाने हॅटट्रिक कशी केली? : वास्तविक श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना पावसामुळं 37-37 षटकांचा खेळवला जात आहे. यामध्ये तीक्षानानं 35व्या आणि 37व्या षटकात आपल्या हॅटट्रिकची कहाणी लिहिली. त्यानं 35व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन बळी घेतले आणि 37व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आणखी एक विकेट घेत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. तीक्षानाची वनडे कारकिर्दीतील ही पहिलीच हॅटट्रिक आहे.
कोणत्या फलंदाजांना केलं बाद : महिष तिक्षानाच्या हॅटट्रिकमध्ये अडकणारा पहिला फलंदाज न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर होता, जो 15 चेंडूत 20 धावा करुन बाद झाला. 34.5 चेंडूवर सँटनरची विकेट घेतल्यानंतर तिक्षानानं 34.6 चेंडूवर नॅथन स्मिथलाही बाद केले. या दोन विकेट्सनंतर त्याला हॅट्ट्रिकसाठी पुढच्या षटकाची वाट पाहावी लागली. मात्र, या प्रतिक्षेचं फळ गोड लागलं. पुढच्याच षटकात तीक्षना आला तेव्हा त्यानं पहिल्याच चेंडूवर मॅट हेन्रीला बाद करुन आपली हॅटट्रिक पूर्ण केली.
तिक्षनानं सामन्यात 44 धावांत 4 बळी घेतले :हॅट्ट्रिकसह, महिष तिक्षानानं दुसऱ्या वनडे सामन्यात 8 षटकांत 44 धावा देत एकूण 4 बळी घेतले. त्यानं 52 चेंडूत 62 धावा करुन बाद झालेल्या मार्क चॅपमनची आणखी एक विकेट घेतली. किवी संघासाठी आपल्या वनडे कारकिर्दीतील तिसरं अर्धशतक झळकावताना मार्क चॅपमननं रचिन रवींद्रसोबत शतकी भागीदारीही केली. रचिन रवींद्रनं 63 चेंडूत 79 धावा केल्या, जे त्याच्या वनडे कारकिर्दीतील चौथं अर्धशतक होते. या दोन फलंदाजांनी झपाट्यानं केलेल्या धावांचा परिणाम म्हणजे किवी संघ 37 षटकांत 255 धावा करु शकला.
हेही वाचा :
- सिरीज हरल्यानंतरही शेजाऱ्यांना WTC मध्ये 5 गुणांची पेनॉल्टी; भारताची मदत होणार?
- 'साहेबां'च्या कर्णधाराचं मोठं ऑपरेशन, मैदानावर कधी परतणार; समोर आली मोठी अपडेट