मुंबई Ramakant Achrekar Memorial : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक दिवंगत रमाकांत आचरेकर यांना मध्य मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कची विशेष आवड होती. हेच शिवाजी पार्क होतं जिथं आचरेकर यांनी केवळ तेंडुलकरलाच नव्हे तर प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि चंद्रकांत पंडित यांसारख्या इतर अनेक खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण दिलं, ज्यांनी नंतर भारताचं प्रतिनिधित्व केलं. आता महाराष्ट्र सरकारनं द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यास मान्यता दिली आहे. सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या आचरेकर यांचं 2 जानेवारी 2019 रोजी मुंबईत निधन झालं.
काय आहे आदेशात : राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं जारी केलेल्या शासकीय प्रस्तावानुसार, शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक 5 इथं रमाकांत आचरेकर यांचं स्मारक बांधण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुंबईच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं स्मारकाच्या बांधकामाची शिफारस केली होती. या स्मारकाचं बांधकाम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (MCGM) आयुक्तांची असेल, असंही या जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसंच स्मारकाच्या आराखड्याला मंजुरी देताना एकही झाड तोडू नये आणि गरज पडल्यास संबंधित प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल, असंही त्यात म्हटलं आहे. पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी बी.व्ही.कामथ मेमोरियल क्लबची असेल आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून वेगळा निधी दिला जाणार नाही, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सचिन तेंडुलकरनं व्यक्त केला आनंद : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तेंडुलकर म्हणाला, 'आचरेकर सरांचा माझ्या आणि इतर अनेकांच्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. मी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं बोलतो. त्यांचं आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरलं. शिवाजी पार्कमध्ये नेहमीच राहण्याची त्यांची इच्छा असायची. आचरेकर सरांचा पुतळा त्यांच्या जन्मस्थानी उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळं मला खूप आनंद झाला आहे.'