लखनौ IPL 2024 LSG vs PBKS : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 हंगामात शनिवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात लखनौ इथं झालेल्या सामन्यात लखनौ संघानं 21 धावांनी विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार गब्बर म्हणजेच शिखर धवनची 70 धावांची खेळी व्यर्थ गेली.
हाताशी आलेला सामना पंजाबनं गमावला : या सामन्यात पंजाब किंग्जसमोर 200 धावांचं लक्ष्य होते. प्रत्युत्तरात शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ 5 विकेट गमावून केवळ 178 धावाच करु शकला. कर्णधार धवननं 50 चेंडूत सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोनं 29 चेंडूत 42 धावा केल्या. या दोघांनी 102 धावांची सलामी दिली होती. पण मधल्या फळीतील फंलदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. परिणामी पंजाबला हातात आलेला सामना गमवावा लागला. लखनौकडून वेगवान गोलंदाज मयंक यादवनं 3 तर मोहसीन खाननं 2 बळी घेत पंजाब संघाचं कंबरडं मोडलं. त्यानं लखनौला सामना जिंकून दिला. सॅम कुरन, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा हे पंजाबचे मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
लखनौच्या फलंदाजांची दमदार खेळी : तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघानं चांगली सुरुवात करत 8 गडी गमावून 199 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकनं 38 चेंडूत 54 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर या सामन्यात कर्णधार असलेल्या निकोलस पुरननं 21 चेंडूत 42 धावा आणि क्रुणाल पांड्यानं 22 चेंडूत 43 धावा केल्या. पंजाबकडून सॅम कुरननं 3 आणि अर्शदीप सिंगनं 2 बळी घेतले.