लागोस Lowest Team Total in Men's T20Is : एखादा संघ फक्त 7 धावांवर ऑलआऊट... तेही एका आंतरराष्ट्रीय सामन्यात, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. पण आयव्हरी कोस्टनं नायजेरियाविरुद्ध हा लज्जास्पद विक्रम केला. तसंच या सामन्यात धावांच्या बाबतीतही विक्रमी विजयाची नोंद झाली आहे.
सात धावांत संघ ऑलआउट : आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. तसंच T20 मधीही सर्वात कमी धावसंख्याही आहे. नायजेरियानं हा सामना 264 धावांनी जिंकला. लागोस येथील तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल मैदानावर हा सामना झाला. वास्तविक लागोस इथं आयसीसी पुरुष T20 विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता गट सी सामन्यात आयव्हरी कोस्टचा नायजेरियाविरुद्ध अवघ्या 7 धावांत खुर्दा उडाला आणि त्यांना 264 धावांनी पराभव स्विकारावा लागला. इथं हे लक्षात घेण्यासारखे आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टॉप 5 सर्वात कमी धावांपैकी 4 धावा 2024 मध्ये बनल्या आहेत.
एक अंकी सांघिक धावसंख्येची पहिलीच वेळ : पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील एक अंकी सांघिक स्कोअरची ही पहिलीच वेळ आहे. या फॉरमॅटमध्ये पूर्वीची किमान धावसंख्या 10 धावा होती. या धावसंख्येवर संघाची दोनदा घसरण झाली आहे. पहिले म्हणजे या वर्षी सप्टेंबरमध्ये मंगोलियाचा संघ सिंगापूरविरुद्ध 10 धावांवर मर्यादित होता, तर गेल्या वर्षी आयल ऑफ मॅनचा संघ स्पेनविरुद्ध याच धावसंख्येवर ऑलआऊट झाला होता.