कोलकाता KKR vs DC IPL 2024 47th match : आयपीएल 2024 मधील 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करुन कोलकाता संघाला 9 बाद 153 धावांचं लक्ष्य दिलं. यावेळी कोलकाता संघाकडून फिलीप सॉल्टनं तडाखेबाज अर्धशतक ठोकत दिल्ली संघावर विजय संपादन केला. कोलकाता संघानं 16.3 षटकात 3 गडी गमावून हा विजय मिळवला. आता दिल्ली संघाची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली. तर 12 गुण घेऊन कोलकाता नाईट रायडर्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
दिल्ली संघाचा संघर्ष :दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय कोलकाता संघानं चुकीचा ठरवला. या सामन्यात दिल्लीचा संघ संघर्ष करताना दिसून आला. दिल्ली संघानं पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावले. त्यामुळे त्यांची अवस्था दयनिय झाली. शॉनं 13 धावा केल्या, तर मॅकगर्क 12 आणि होप 6 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर दिल्लीच्या संघानं पोरेलचा बळीही गमावला. पोरेलला हर्षित राणानं तंबूची वाट दाखवली. त्याला 15 चेंडूत 18 धावा करता आल्या. त्यानंतर मात्र कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांनी संघाची कमान संभाळली. या दोघांमध्ये 25 धावांची चांगली भागीदारी होत असतानाच वरुण चक्रवर्तीनं त्यांची भागीदारी फोडून दिल्ली संघाला मोठा धक्का दिला. त्यानं कर्णधार ऋषभ पंतला तंबूचा रस्ता दाखवला. ऋषभ पंत 20 चेंडूत 27 धावा करुन परतला. यानंतर ट्रिस्टन स्टब्जदेखील फार काही चमक दाखवू शकला नाही. चार धावा काढून तो तंबूत परतला. त्यानंतर कुलदीप यादवनं सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. त्यानं 35 धावांचं योगदान देत डाव सावरला. अखेर दिल्ली संघानं कोलकाता संघाला 153 धावांचं माफक लक्ष्य दिलं. कोलकाता संघाकडून संघाकडून वरुण चक्रवर्तीनं 3, तर वैभव आणि हर्षीनं दोन - दोन बळी टिपले. मिचेल स्टार्क आणि सुनील नरेननं प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
दिल्ली कॅपिटल्सवर कोलकाताचा सहज विजय :कोलकाता नाईट रायडर्स संघानं दिल्लीच्या संघाला 153 धावात रोखल्यानंतर कोलकाता संघानं जोरदार खेळी केली. 154 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या दिल्लीच्या फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेट्ससाठी 79 धावांचा भक्कम पाया रचला. सॉल्टनं या सामन्यात चांगलाच रंग भरला. त्यानं 33 चेंडूत धमाकेदार 68 धावा कुटल्या. यात त्यानं 7 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. त्याच्यानंतर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यरनं नाबाद 33 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. त्याला व्यंकटेश अय्यरनं 26 धावा करुन चांगली साथ देत दिल्ली संघावर सहज मात करण्यात महत्वाची भूमिका बजावली. दिल्लीकडून अक्षर पटेलनं 2 बळी मिळवले, तर विल्यम्सनं एका फलंदाजाला तंबूत पाठवलं.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग-11
पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (wk/c), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स, खलील अहमद