पुणे Big Player Ruled Out : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून पुण्यात होणार आहे. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन या सामन्यात खेळू शकणार नाही. तो अजूनही त्याच्या मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान विल्यमसनला दुखापत झाली होती. दुसऱ्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा संघाला होती. पण असं होऊ शकलं नाही आणि आता तो आपल्या फिटनेसवर काम करण्यासाठी न्यूझीलंडमध्येच राहणार आहे.
तिसऱ्या कसोटीत करु शकतो पुनरागमन : न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की, विल्यमसन सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्याची दुखापत बऱ्याच अंशी बरी झाली असली तरी तो अजून कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यास तयार नाही. स्टीडला विल्यमसनबाबत घाई करायची नाही. त्यांनी त्याला रिकव्हरी आणि तयारीसाठी पूर्ण वेळ देण्याचं बोललं आहे. तसंच तिसऱ्या कसोटीत विल्यमसनच्या पुनरागमनाची आशा स्टेडनं व्यक्त केली आहे.
भारताला होणार फायदा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार 24 ते 28 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी एक केन विल्यमसन त्याच्या मांडीच्या दुखापतीतून बरा होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला होती. पण हे होऊ शकलं नाही. न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का आहे. भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत करुन भारतात पहिल्यांदाच मालिका जिंकण्याची संधी त्यांच्याकडे होती. विल्यमसन उपस्थित असल्यानं संघाला त्याच्या अनुभवाचा फायदा झाला असता. परंतु त्यांच्या अनुपस्थितीत हे काम आता कठीण होऊ शकतं.