महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाच्या 'इंग्लिस'चं 'जोशा'त पदार्पण; कांगारुंनी उभारला धावांचा 'एव्हरेस्ट' - SL VS AUS 1ST TEST

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील गॉल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात, दुसऱ्या दिवसाच्या खेळातही कांगारु संघाच्या फलंदाजांची चमक दिसून आली.

SL vs AUS 1st Test
जोश इंग्लिस (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Jan 30, 2025, 5:17 PM IST

गॉल SL vs AUS 1st Test :श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात गॉल स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात, कांगारु संघाच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेचे गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. सामन्याच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकं झळकावली, तर दुसऱ्या दिवशी, त्याच्या कसोटी कारकिर्दीचा पहिला सामना खेळणाऱ्या जोश इंग्लिसनंही शतक झळकावलं, ज्यामध्ये त्यानं 102 धावांची शानदार खेळी केली.

जोश इंग्लिसनं कसोटी पदार्पणात ठोकलं दुसरं सर्वात जलद शतक : श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 29 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज जोश इंग्लिस फलंदाजीसाठी आला तेव्हा कांगारु संघानं तीन विकेट गमावून 401 धावा केल्या होत्या. येथून, इंग्लिसनं उस्मान ख्वाजासोबत डाव पुढं नेत वेगानं धावा काढण्यास सुरुवात केली. इंग्लिस आणि ख्वाजा यांच्यात चौथ्या विकेटसाठी 146 धावांची भागीदारी झाली. ख्वाजा 232 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लिससोबत अ‍ॅलेक्स कॅरी आला.

90 चेंडूत ठोकलं शतक :इंग्लिसनं त्याच्या कसोटी पदार्पणातील पहिलं शतक फक्त 90 चेंडूत पूर्ण केलं, ज्यामुळं जोश इंग्लिस आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू बनला आहे, त्यानं ड्वेन स्मिथचा विक्रम मोडला आहे. ज्यानं 2004 मध्ये केपटाऊन इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 93 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्याच वेळी, कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवनच्या नावावर आहे, ज्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणात 85 चेंडूत शतक ठोकलं होतं.

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक करणारे खेळाडू :

  • शिखर धवन - 85 चेंडू विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2013, मोहाली)
  • जोश इंग्लिस - 90 चेंडू विरुद्ध श्रीलंका (2025, गॉल)*
  • ड्वेन स्मिथ - 93 चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2004, केपटाऊन)
  • पृथ्वी शॉ - 99 चेंडू विरुद्ध वेस्ट इंडिज (2018, राजकोट)
  • मॅट प्रायर - 105 चेंडू विरुद्ध वेस्ट इंडिज (2007, लॉर्ड्स)

कांगारुंनी उभारला धावांचा डोंगर : पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियानं 154 ओव्हर फलंदाजी करत 6 बाद 654 धावांवर आपला डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजानं द्विशतक झळकावत 232 धावा केल्या. तसंच जोश इंग्लिस व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथनंही 141 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर ट्रवीस हेडनं आक्रमक 57 धावा केल्या. तर श्रीलंकेचे गोलंदाज घरच्या मैदानावर मात्र संघर्ष कताना दिसले. त्यांच्याकडून प्रभात जयसुर्या आणि जेफ्री व्हॅंडरसे यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तर प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची अवस्था अत्यंत दयनीय झाली. अवघ्या 30 धावांवर त्यांनी 3 विकेट गमावल्या असून बातमी लिहेपर्यंत ते अद्याप 623 धावांनी पिछाडीवर आहेत.

हेही वाचा :

  1. BGT मध्ये 5 सामन्यांत 184 धावा, मात्र श्रीलंकेत एकाच डावात 'डबल सेंच्युरी'; थेट 'डॉन'ची बरोबरी
  2. EXCLUSIVE : पुण्यात 2 वर्षांनी होणार T20I सामना, तयारीबाबत काय म्हणाले MCA चे पदाधिकारी?

ABOUT THE AUTHOR

...view details