किंगस्टन Best Economy Rate in Test :किंगस्टनमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या एका गोलंदाजानं इतकी चांगली गोलंदाजी केली की, विक्रम मोडला. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये गेल्या 46 वर्षात घडलेली अशी पहिलीच घटना होती. त्यानं केलेल्या कहराचा परिणाम असा झाला की बांगलादेश संघ दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा गाठण्यापासून खूप दूर राहिला. त्यामुळं यजमान वेस्ट इंडिजला सामन्यावर ताबा मिळवण्याची संधी मिळाली. ज्या खेळाडूमुळं वेस्ट इंडिज संघ दुसऱ्या कसोटीत मजबूत स्थितीत आहे तो म्हणजे जेडन सील्स, ज्यानं भारतीय गोलंदाजाचा विक्रम मोडून बांगलादेशविरुद्ध इतिहास रचला आहे.
जेडन सील्सनं मोडला भारतीय गोलंदाजाचा विक्रम : जेडेन सील्सनं बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात 15.5 षटकं गोलंदाजी केली, यात 10 मेडन्स टाकल्या आणि 5 धावांत 4 बळी घेतले. यात, त्याचा इकॉनामी रेट 0.31 होता, जो 1978 नंतर पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये नोंदलेला सर्वोत्तम इकॉनामी रेट आहे. याआधी हा विक्रम भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नावावर होता, ज्यानं 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 0.42 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली होती. उमेशनं 21 षटकांत 16 मेडन्स टाकल्या आणि 9 धावांत 3 बळी घेतले. पण उमेशचा हा विक्रम आता जेडन सील्सनं मोडला आहे.