मुंबई Shortest Test Cricket Match : क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी घातक ठरु शकते का? फक्त 66 मिनिटं आणि 62 चेंडूत पाच दिवस चालणारा कसोटी सामना पूर्ण होऊ शकतो का? सामन्यात चेंडू बॅटशी नाही तर फलंदाजाच्या हाडांशी स्पर्धा करु शकतो का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं होय असंच येतील. कारण 1998 साली झालेल्या एका सामन्यात असंच पाहायला मिळालं. ही खेळपट्टी जमैकाच्या सबीना पार्क मैदानाची होती. या ऐतिहासिकदृष्ट्या धोकादायक सामन्यात भाग घेणारे संघ होते वेस्ट इंडिज आणि इंग्लंड. तथापि, खराब खेळपट्टीमुळं सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती किंवा शेवटचीही नव्हती. पण 29 जानेवारी 1998 रोजी झालेल्या या सामन्यात जे घडलं ते क्वचितच पाहायला मिळालं असेल.
फलंदाज मैदान सोडून जाण्याच्या तयारित : वास्तविक, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार माईक अर्थ्टननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अर्थटनला सलामीला यावं लागलं आणि त्याच्यासोबत यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक स्टीवर्टही मैदानात उतरला. पण खेळपट्टीवर पोहोचल्यानंतर खरी लढाई सुरु व्हायची होती. जिथं कर्टली ॲम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श ही जोडी हातात चेंडू घेऊन तयार होती. मात्र सामना सुरु झाल्यावर चेंडू खेळपट्टीवर आदळू लागला की, फलंदाज मैदान सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते. कारण या खेळपट्टीवरुन तुफानी वेगानं येणारे चेंडू हाडे मोडण्यास कारणीभूत ठरत होते.